पाटण तालुक्यासह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राला मुसळधार पावसाने झोडपले
पाटण : रविवार (दि. १५) दुपारपासून पाटण तालुक्यासह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राला मुसळधार पावसाने झोडपले असून अद्यापही पाऊस सुरूच असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. दरम्यान, कोयनानगर येथे गेल्या २४ तासात १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार तालुक्यातील कोयना, नवजा, मोरगिरी, ढेबेवाडी, मल्हारपेठ, चाफळ, तारळे, मणदुरे विभागात रविवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारीही पाऊस थांबला नसल्याने तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाने शेतीची मशागत व पेरणीची कामे खोळंबली आहेत. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच ही कामे सुरू होतील.
कोयना धरणातील पाणी पातळी २०६१ फूट (६२८.१९३ मीटर) असून एकूण पाणीसाठा २२.४६ टीएमसी (२१.३४%) झाला आहे. तर उपलब्ध साठा: १७.४३ टीएमसी (१७.३१%) आहे. धरणात सध्या १ हजार ३३६ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोयनानगर येथे गेल्या २४ तासात १०४ तर एकूण २५१, नवजा येथे ८० तर एकूण २४१ महाबळेश्वर येथे ७० तर एकूण १९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
0000