सावकाराच्या जाचाने शेतकऱ्याची आत्महत्या
वारंवार धमकावणीमुळे उचलले टोकाचे पाऊल
बीड: प्रतिनिधी
सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. राम फटाले असे या शेतकऱ्याचे नाव असून डॉ. लक्ष्मण जाधव, त्यांची पत्नी आणि अन्य सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फटाले यांनी सात वर्षांपूर्वी डॉ. जाधव याच्याकडून दरमहा दहा टक्के व्याजाने अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. दरमहा 25 हजार रुपये देऊन त्याची परतफेड देखील केली जात होती. मात्र डॉ. जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून फटाले यांना वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. कर्जाची परतफेड करता येत नसेल तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे आणून सोड, असे सांगण्यापर्यंत सावकाराची मजल गेली. यामुळे अस्वस्थ झालेल्या फटाले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात आरोपींपैकी तिघेजण अटकेत असून इतरांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ जाधव हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे. मागील महिन्यात सावकारी जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केली होती. ते प्रकरण ताजे असतानाच ही आणखी एक घटना घडली आहे.