- राज्य
- 'विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेतच शिक्षण देणे आवश्यक'
'विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेतच शिक्षण देणे आवश्यक'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राज्य सरकारला घरचा आहेर
नागपूर: प्रतिनिधी
देशातील सर्वच भाषा या राष्ट्रभाषा असून विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देणे अधिक हिताचे आहे, अशी संघाची भूमिका आहे. यापूर्वी देखील ती वारंवार मांडण्यात आली आहे. आजही संघ त्या भूमिकेवर ठाम आहे, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला.
राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राच्या आधारावर राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी शिकणे बंधनकारक करणारा शासन निर्णय जारी केला. मात्र, विरोधकांबरोबरच शिक्षणतज्ञ, शिक्षक, पालक, विचारवंत यांनी या निर्णयाला विरोध केला. अखेर सरकारला माघार घेणे भाग पडले. या प्रकरणाने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना तब्बल 19 वर्षाने एका व्यासपीठावर आणले.
या पार्श्वभूमीवर सत्तारूढ भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या संघाने नेमकी सरकारच्या विरोधातील भूमिका घेतली आहे. अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या बैठकीत मणिपूर मध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न, सीमा भागातील देशाच्या सुरक्षेचे प्रश्न याबरोबरच त्रिभाषा सूत्राबद्दलही विचार विनिमय करण्यात आला. यावेळी संघाच्या वतीने आंबेकर यांनी स्थानिक भाषांना प्राधान्य देण्याचे संघाचे धोरण असल्याचे स्पष्ट केले.