- संपादकीय
- पडदा उघडला, नाट्य सुरू झाले!
पडदा उघडला, नाट्य सुरू झाले!
राज आणि उद्धव या दोन भावांना एकत्र येण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले परंतु यश आले नाही. हिंदी सक्तीच्या आदेशाने मात्र दोघे एकत्र आल्याचे सांगितले जात आहे. राजकीय अस्तित्त्वासाठी दोघांना एकत्र येण्यावाचून तसा पर्याय राहिलेला नव्हता. आता दोघे एकत्र येत असले, तरी त्यांना मिळणारे यश किती असेल, हे आगामी पाच महिन्यांत स्पष्ट होईल.
स्थित्यंतर / राही भिडे
दोन दशकांनंतर अखेर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले; मात्र हे एकाच दिवसात घडले नाही. त्याची सुरुवात १९ एप्रिलला झाली होती. महेश मांजरेकर यांनी राज यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी उद्धव यांना घातलेली साद महत्वाची ठरली. राज यांच्या या सादेला महाराष्ट्रापुढे आमच्यातील वाद क्षुल्लक आहेत, असे म्हणत उद्धव यांनीही प्रतिसाद दिला. आता ठाकरे यांची युती होणारच अशी जाहीर चर्चा सुरू झाली असतानाच दोन्ही बंधू परदेश दौऱ्यावर गेले. या दोघांत परदेशात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे; परंतु लगेच एकत्र येण्याची भाषा केली असती, तर कार्यकर्ते दुखावले गेले असते. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताच निर्णय घेतला गेला असा संदेश गेला असता. शिवाय दोन्ही भाऊ म्हणजे केवळ कुटुंब नाही, त्यांच्या पक्षाच्या संघटना आहेत. गेल्या दोन दशकांत परस्पर टीका आणि एकमेकांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा एवढ्या लवकर विसर पडणे शक्य नाही. राज यांनी एकत्र येण्याची काडी टाकून पाहिली. तिला दोन्ही पक्षातून चांगलाच प्रतिसाद मिळत होता. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतच राहून लोकसभेला चांगले यश मिळवले; परंतु त्यांच्यापासून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटालाही चांगल्या जागा मिळाल्या होत्या. विधानसभा, त्याअगोदरच्या नगरपालिकांच्या निवडणुकीत उद्धव यांच्या पक्षाला फार यश मिळवता आले नाही. विधानसभेत तर गेल्या ३५ वर्षांतील सर्वांत नीचांकी जागा मिळाल्या. राज यांच्या पक्षाच्या तर मान्यतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभेत, विधानसभेत एकही जागा नाही. मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेले सर्व सदस्य सोडून गेलेले. पुणे, नाशिक, नगर, ठाणे, कल्याणमध्येही पक्षाला फारसे स्थान नाही. पक्षाच्या धरसोड वृत्तीने पक्षावर कुणीच विश्वास ठेवायला तयार नव्हते. नेते, कार्यकर्ते आत्मविश्वास गमावून बसले होते. सत्ता नाही, पदे नाहीत, संघर्ष करायचा तरी किती असा प्रश्न कार्यकर्त्यांना, नेत्यांना पडत होता. बहुतांश नेत्यांनी सत्तेतील पक्षांसोबत जाण्याची वाट निवडली होती. त्यातच ठाकरे ब्रँड संपवण्याची भाषा सत्तेतील लोक करायला लागले होते. हा ठाकरे घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. अशा वेळी राज आणि उद्धव यांचे एकत्र येण्याचे घाटत होते. राज यांच्या टाळीनंतर दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याची वाट न पाहताच कार्यकर्ते आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र यायला लागले होते. दोन्ही पक्षांतील नेत्या, कार्यकर्त्यांना पराभूत मानसिकता सोडून लढायचे असेल, तर दोन्ही भावांनी मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे, असे वाटत होते. भाजपला एवढी मदत करूनही तो वापर करून फेकून देतो, अशी मानसिकता तयार झाली होती. राज जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे, उदय सामंत यांना भेटत असले, डिनर डिप्लोमसी करीत असले, तरी विधानसभेच्या निवडणुकीत अमित ठाकरे यांचा झालेला पराभव आणि त्याला कोण जबाबदार हे ते विसरले नव्हते.
राज यांच्या परदेश दौऱ्यानंतर पुढाकार कोण घेणार यावरून युतीची चर्चा बारगळली होती; मात्र याच काळात ठाकरे गट युतीबाबत आशावादी असल्याचे खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. संदीप देशपांडे यांच्या टीकेला शिवसेनेतून कुणीही उत्तर देत नव्हते. ठाकरे गट युतीसाठी सकारात्मक असल्याचे समोर आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत भेटीगाठींचा सिलसिला सुरू केला. या पार्श्वभूमीवर सरकारने हिंदी सक्तीचा आदेश काढला. त्यात संदिग्धता ठेवली. हिंदी सक्तीला तज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रातील मंडळींनी विरोध केला. राज यांनी सरकारविरोधात ठाम पवित्रा घेतला. उद्घव यांनीही हिंदी सक्तीविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दोन्ही भावांनी वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या; परंतु मराठी वाचवण्यासाठीच्या लढ्यात मराठी माणसांत फूट नको, या कारणासाठी दोघांनी एकत्र येण्याचा पवित्रा घेतला. दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्यो त्याचा नाही म्हटले, तरी परिणाम होणारच. विशेषतः मुंबई, ठाणे परिसरात त्याचा फटका काही प्रमाणात महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला बसणार आहे. त्यामुळे हे दोघे एकत्र येणारच नाहीत, अशी व्यूहरचना करण्यात आली; परंतु ती यशस्वी झाली नाही. मराठी माणसांच्या नावाखाली या दोन नेत्यांना आपलेच पक्ष वाचवण्याची संधी मिळाली आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांत उत्तर भारतीयांची काही प्रमाणात मुजोरी वाढली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शीर्षस्थ नेत्यांनीच मुंबईत मराठी येण्याची आवश्यकता नाही, असे विधान केले होते. त्यामुळे भाजपला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. राज-उद्धव यांना एकत्र आणण्यात अशा अनेक घडामोडी घडल्या. त्यातला एक तर्क तर अतिशय वेगळाच आहे. महाराष्ट्रात ‘बिहार पॅटर्न’ आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपला राज्यात शत प्रतिशत यश मिळवायचे आहे. विरोधकांचे अवकाश व्यापण्यासाठी आता जागाच नाही. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे अवकाश अगोदर कमी करावे लागेल. त्यासाठी राज आणि उद्धव यांना पडद्याआडून बळ देऊन त्यांना मोठे केले, की शिंदे यांच्या पक्षाचे काही प्रमाणात खच्चीकरण होईल. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाच्या जागा कमी करण्यासाठी चिराग पासवान यांचा कसा उपयोग करून घेतला गेला, याचा संदर्भ त्यासाठी दिला जातो. मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेले राज आणि उद्धव राजकारणातही एकत्र दिसणार का? आगामी मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राज आणि उद्धव एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठे बदल घडू शकतात. राज आणि उद्धव दोघेही मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर जोर देतात. जर हे दोघे एकत्र आले, तर मराठी मतदारांमध्ये विखुरलेली मते एकवटली जाऊ शकतात. यामुळे शिवसेना आणि मनसेची एकत्रित ताकद वाढेल. विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे यासारख्या शहरी भागात दोन्ही पक्षांना मोठे यश मिळू शकते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत याचा सर्वात मोठा परिणाम दिसू शकतो. सध्या भाजप आणि शिंदे गटाची ठाकरे यांच्या पक्षाशी स्पर्धा आहे. राज आणि उद्धव एकत्र आल्यास, मराठी मतांचे विभाजन थांबेल आणि त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता टिकवता येऊ शकते. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या विचारसरणीला पुन्हा बळ मिळेल. यामुळे शिंदे गट आणि भाजप मराठी मतांचे ध्रुवीकरण रोखण्याची खेळी करू शकतो. राज आणि उद्धव एकत्र आले, तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना, विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, युतीच्या नव्या समीकरणांचा विचार करावा लागेल. राज ठाकरे यांचा मराठी आणि हिंदुत्वाचा आक्रमकपणा महाविकास आघाडीमधील काही नेत्यांना न पटणारा असू शकतो. त्यामुळे उद्धव यांनी मनसेसोबत स्वतंत्र युती केली, तर महाविकास आघाडीची एकजूट कमजोर होऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्वतंत्र रणनीती आखावी लागू शकते.
000
About The Author
