- राज्य
- 'दोन काय चार भाऊ एकत्र येऊ द्या, आम्ही लढायला तयार'
'दोन काय चार भाऊ एकत्र येऊ द्या, आम्ही लढायला तयार'
प्रसाद लाड यांचे ठाकरे बंधूंना आव्हान
मुंबई: प्रतिनिधी
दोन भाऊच काय, चार भाऊ एकत्र येऊ द्या. भाचे पुतणे येऊ द्या. होऊन जाऊ द महासंग्राम. आम्ही लढाईला तयार आहोत, अशा शब्दात भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे.
तब्बल 19 वर्षानंतर मराठी विजय मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एका मंचावर आले. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. मात्र, एकत्र आलो आहोत, एकत्र राहू. वाकून फेकून देणाऱ्याला आम्ही दोघे फेकून देऊ, असे विधान करून उद्धव ठाकरे यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
संभाव्य युती बद्दल बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, मराठी विजय मेळाव्यातील दोघांच्या भाषणात फरक होता. उद्धव ठाकरे मराठी बद्दल काय बोलले? त्यांनी केवळ गद्दार, धोका, खंजीर अश शब्दांचा वापर केला. त्यात मराठी बद्दलचा उल्लेखही नव्हता, अशी टीका लाड यांनी केली.
भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. कोणत्याही युती, आघाडीशी लढण्यास आम्ही सक्षम आहोत, असा दावा लाड यांनी केला. आज उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना बरोबर घेत आहेत. मात्र, यापूर्वी अनेकदा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा अपमान केला आहे, त्याबद्दल माफी मागण्यास उद्धव ठाकरे तयार आहेत का, असा सवाल देखील लाड यांनी केला.
मराठी असल्याबद्दल, मराठी भाषेबद्दल आम्हा सर्वांना अभिमान आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांना मराठी आली पाहिजे, याबद्दलही दुमत नाही. मात्र, मराठी येत नाही किंवा मराठी बोलत नाही यासाठी कायदा हातात घेऊन मारहाण करणे अयोग्य आहे, असेही ते म्हणाले.