- राज्य
- 'केव्हाही उडू शकतो महायुद्धाचा भडका'
'केव्हाही उडू शकतो महायुद्धाचा भडका'
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गंभीर इशारा
नागपूर: प्रतिनिधी
माणसा माणसातील प्रेम, सौहार्द आणि आत्मियता संपुष्टात येत आहे. जगभरात अनेक ठिकाणी युद्धांचा भडका उडालेला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी महायुद्धाची सुरुवात होऊ शकते. जगातील महासत्तांची हुकूमशाही आणि अरेरावी वृत्ती याला कारणीभूत असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
'बियाँड बॉर्डर्स' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना गडकरी यांनी हा इशारा दिला. भारत ही गौतम बुद्धांची भूमी आहे. या भूमीत सत्य, शांती आणि अहिंसा ही मूल्य रुजलेली आहेत. मात्र, सध्याच्या काळात जगभरात युद्धजन्य परिस्थिती आहे. कोणत्याही क्षणी महायुद्धाचा भडका उडू शकतो अशी परिस्थिती आहे. या जागतिक परिस्थितीचा अभ्यास करूनच आपण आपली पुढील धोरणे आखली पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.
मानवी अस्तित्वासमोरच आव्हान
सध्याच्या काळातील युद्धाचे तंत्रज्ञान खूपच प्रगत झाले आहे. रणगाडे आणि लढाऊ विमाने यांचे महत्त्व कमी होत आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोन याच्या आधारे दूरवर हल्ले करणे शक्य झाले आहे. मात्र, या शस्त्रांचा अमानुष वापर करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. केवळ लष्करी आस्थापनांपुरते मर्यादित न राहता मानवी वस्त्यांवर, शाळांवर आणि रुग्णालयांवर सुद्धा क्षेपणास्त्र डागली जात आहेत. त्यामुळे मानवी अस्तित्वासमोरच आव्हान उभे राहिले आहे, याची जाणीव गडकरी यांनी करून दिली.
देशात संपत्तीचे विकेंद्रीकरण आवश्यक
देशात गरिबांची संख्या वाढत आहे. मूठभर श्रीमंतांची संपत्ती वाढत आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील तरी रुंदावत आहे. त्यामुळे मोठी आर्थिक, सामाजिक आव्हाने उभी राहू शकतात. हे टाळण्यासाठी देशातील संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे, असेही गडकरी म्हणाले.