'कोथरूड पोलिसांवर गुन्हा दाखल नाहीच होणार'
महिला कार्यकर्त्यांच्या तक्रारी प्रमाणे काहीच न घडल्याचा पोलिसांचा दावा
पुणे: प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथील विवाहिते संदर्भात तीन महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांकडून त्यांच्याशी कोणतेही गैरवर्तन झालेच नाही, असा दावा करून संबंधित पोलिसांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात येणार नाही, असे पुणे पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
पतीच्या छळाला कंटाळून पुण्यात आलेल्या विवाहित महिलेला तीन महिला कार्यकर्त्यांनी मदत केली. या महिलेच्या सासर कडून नात्यात असलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने कोथरूड पोलिसांना अवैधपणे बरोबर घेऊन या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली, जातिवाचक शिवगाळ केली आणि विनयभंग केला, अशी तक्रार या महिलांनी केली आहे. मात्र, असे काही घडलेच नसल्याचा दावा पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी केला.
कथित पीडित महिला पुण्यात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी छत्रपती संभाजीनगर येथे ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यांच्याकडून कोथरूड पोलिसांना रिचार्ज पत्र देऊन मदतीची मागणी करण्यात आली. त्यानुसार दोन महिला कर्मचारी त्यांच्याबरोबर देण्यात आल्या. त्यांनी कोंढवा येथील वन स्टॉप सेंटर येथे दाखल असलेल्या या महिलेला ताब्यात घेतले आणि ते छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले. या प्रकरणात पोलिसांचा कोणताही दोष नसून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही, असे कदम यांनी सांगितले.