- राज्य
- दादर कबूतरखाना बंद करण्यास जैन समाजाचा विरोध
दादर कबूतरखाना बंद करण्यास जैन समाजाचा विरोध
मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मध्यस्थीचे प्रयत्न
मुंबई: प्रतिनिधी
दादर येथील कबूतरखाना बंद करून त्या जागेवर जाळी घालण्यास स्थानिक नागरिकांनी, विशेषतः जैन समाजाने प्रचंड विरोध केला आहे. मलबार हिल चे आमदार आणि ज्येष्ठ मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे याप्रकरणी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ न देता कबुतरे ही जगली पाहिजेत, या दृष्टीने मध्यम मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होत असल्याच्या कारणाने मुंबई उच्च न्यायालयाने दादर कबूतर खाना बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले. त्यानुसार महापालिकेने कबूतर खाना बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्या जागेवर कबुतरे येऊ नये यासाठी जाळी घालण्यात येत आहे. मात्र, या कारवाईला विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. कबुतरांना खाण्यासाठी धान्य घालण्यावर देखील न्यायालयाने बंदी घातली असून तसे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मी नुकतेच एका रिकाम्या जागी नवीन कबूतर खाण्याचे भूमिपूजन केले आहे. त्या परिसरात माणसांची वस्ती नाही. त्यामुळे त्या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून कबुतरांचे संगोपन करणे शक्य आहे, असे लोढा यांनी सांगितले. आपण लवकरच मुंबईचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार आहोत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, रेस कोर्स अशा ठिकाणी कबूतरखाना सुरू करावा. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रशासकीय विभागात मोकळी जागा ठेवून त्या ठिकाणी कबुतरांचे संगोपन करण्याची व्यवस्था करावी, यासाठी विनंती करणार आहे, असेही लोढा यांनी सांगितले.
नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे याबद्दल कोणताही वाद होऊ शकत नाही. मात्र, नागरिकांचे आरोग्य अबाधित राखत कबुतरांचे संगोपन करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील, त्याची चाचणी महापालिका आयुक्तांशी चर्चा करून करणार असल्याचेही ते म्हणाले.