- राज्य
- 'पोलिसांवर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करा'
'पोलिसांवर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करा'
टाळाटाळ करीत असल्याबद्दल पुणे पोलिसांवर टीकेचा भडीमार
पुणे: प्रतिनिधी
पोलिसांच्या विरोधात तक्रार देऊन 24 तासाहून अधिक कालावधी उलटला असल तरी देखील सहकाऱ्यांना बचावण्यासाठी पोलिसांकडून ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप पुणे पोलिसांवर केला जात आहे. अनेक बड्या नेत्यांनी हस्तक्षेप करून देखील गुन्हा दाखल होत नसल्याने शहरातील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील एका प्रकरणात अनाधिकाराने युवतींच्या घरात घुसून त्यांची कायदेशीर प्रक्रियेशिवाय तीन तास चौकशी करणे, चौकशी दरम्यान जातीवाचक शिवीगाळ आणि विनयभंग करणे, असे आरोप तीन महिलांनी कोथरूड पोलिसांच्या विरोधात केले आहेत.
सासरच्या छळाला कंटाळून 25 वर्षाची पीडिता पुण्यात निघून आली. येथील तीन महिला कार्यकर्त्यांनी तिला मदत केली. सासरकडून नातेवाईक असलेल्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी कोथरूड पोलिसांची मदत घेऊन या पीडितेसह तीन महिला कार्यकर्त्यांचा शोध घेतला. कोथरूड पोलीस ठाण्याचे स्थानिक पोलीस, छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे आणि कॉन्स्टेबल अमोल कामटे कोणतेही वॉरंट असताना पूर्वकल्पना न देता आपल्याकडे आले आणि गैर वर्तणूक करत त्यांनी आपल्याला बेकायदेशीर रित्या ताब्यात घेतले, असा महिला कार्यकर्त्यांचा आरोप आहे.
पोलिसांनी आपल्या घराच्या शयनकक्ष आणि स्नानगृहाची तपासणी केली. अंतर्वस्त्रही तपासली. जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक गैरवर्तन केले. त्यानंतर बेकायदेशीरपणे आपल्याला तीन तास पोलीस कोठडी ठेवण्यात आले, असा महिला कार्यकर्त्यांचा आरोप आहे.
या कार्यकर्त्यांच्या तक्रारीची दखल पोलिसांकडून घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह सुजात आंबेडकर आणि अन्य नेत्यांनी रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, कोथरूड पोलिसांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. महिला कार्यकर्त्यांच्या आरोपात तथ्य असल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही वरिष्ठ पोलीस अधिकारी देत आहेत.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दूरध्वनीवर संपर्क साधून कोथरूड पोलिसांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. प्रकरणात तथ्य आहे की नाही याचा तपास नंतर करत बसा. आधी महिलांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करा. हे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तुम्ही हे करत नसाल तर थेट सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहू का, असा सवाल त्यांनी केला. तसेच कोथरूड पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.