नाना पटोले यांची पदावरून होणार उचलबांगडी?
काँग्रेसमध्ये होणार मोठे संघटनात्मक फेरबदल
On
मुंबई: प्रतिनिधी
आगामी लोकसभा आणि अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत. या फेरबदलात आपल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात वादग्रस्त ठरलेले नाना पटोले यांची श्रेष्ठी पाठराखण करणार की उचल बांगडी, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
नाना पटोले यांच्या बाबत काँग्रेसमध्येच मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. ज्येष्ठ नेत्यांना विचारात न घेता ते एककल्ली पद्धतीने मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांच्याच पक्षातील नेते करीत आहेत. विधान परिषद निवडणुकीत सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्ये जे घमासान घडले त्यावरून नाराज झालेल्या माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी थेट राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहून पटोले यांच्याबद्दल तक्रार केली.
पटोले यांच्याबरोबर पक्षाचे काम करणे अशक्य असल्याचे थोरात यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले. खुद्द विदर्भातील अनेक मोठे काँग्रेस नेतेही पटोले यांच्या विरोधात आहेत. काही काळापूर्वी पक्षाच्या तब्बल 21 नेत्यांनी केंद्रीय निरीक्षकांची भेट घेऊन पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करावे अशी मागणी केली. पटोले यांच्या कारभारामुळे पक्षाचा पारंपारिक मतदार असलेला दलित आणि मुस्लिम समाज पक्षापासून दूर जात आहे. त्यांच्यामुळे पक्षात गटबाजी होत आहे, असे आरोप या नेत्यांनी केले.
पटोले यांच्या विरोधात आतापर्यंत अनेकदा तक्रारी होऊनही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे पटोले यांना श्रेष्ठींचा आशीर्वाद असल्याचे समजले जात आहे. मात्र, सन 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर होऊ घातलेली विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रसह आठ राज्यातील पक्ष संघटनेमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे भवितव्य फेरबदलाच्या निर्णयात दडले आहे.
Comment List