दाक्षिणात्य नेत्याच्या गळ्यात पडणार भाजप अध्यक्षपदाची माळ
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पक्षाला मिळणार नवा अध्यक्ष
नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. पक्ष विस्ताराच्या दृष्टीने यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची माळ दक्षिण भारतीय नेत्याच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे.
जे पी नड्डा यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कार्यकाळ यापूर्वीच संपुष्टात आलेला आहे. लोकसभा निवडणूक लक्षात घेता त्यांचा कार्यकाळ 30 जून पर्यंत वाढविण्यात आला. निवडणुकीनंतर नड्डा यांच्यावर केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद हे तत्व पाळले जात असल्यामुळे नड्डा यांना अध्यक्षपदासाठी मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. भाजपच्या घटनेप्रमाणे देशातील निम्म्या राज्यात पक्षांतर्गत निवडणुका पार पडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करता येते. त्यानुसार बूथ स्तरापासून राज्यस्तरापर्यंत पक्षांतर्गत निवडणुका पार पाडाव्या, असे आदेश राज्यांच्या पक्ष नेतृत्वाला देण्यात आले आहेत. त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल.
मागच्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने कार्यक्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली आहे. मात्र, दक्षिणेकडील राज्यांमध्ये पक्षाला फारसा शिरकाव करता आलेला नाही. या राज्यात पक्षविस्तार करून काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांसमोर दक्षिणेत पाय रोवण्याच्या दृष्टीने यावेळी दाक्षिणात्य नेत्याकडे पक्षाची सूत्रे सोपविली जाणार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. यापूर्वी देखील अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना व्यंकय्या नायडू यांच्यासह दक्षिणेतील तीन नेत्यांकडे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोपविण्यात आले होते.
Comment List