कृत्रिम गर्भधारणेने दुर्मीळ माळढोक पक्षाच्या पिल्लाचा जन्म
राजस्थान वनविभागाने घडवला इतिहास
जैसलमेर: वृत्तसंस्था
मानवी प्रजननासाठी कृत्रिम गर्भधारणेचा मार्ग सर्रास अवलंबला जातो. मात्र, नष्टप्राय होत चाललेल्या माळढोक या पक्ष्याच्या प्रजननासाठी कृत्रिम गर्भधारणेचा प्रयत्न यशस्वी करून राजस्थान वनविभागाने इतिहास रचला आहे. या प्रयोगाला मिळालेल्या यशामुळे प्राण्यांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती टिकवून ठेवण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
देशभरात माळढोक पक्षांची संख्या दीडशे पेक्षाही कमी आहे. यापैकी 90 टक्के पक्षी राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात आढळतात तर उर्वरित माळढोक महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यात आढळून येतात. महाराष्ट्रात सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात विस्तार असलेले माळढोक अभयारण्य आहे. मात्र, या विस्तीर्ण अभयारण्यात केवळ एक माळढोक पक्षी शिल्लक आहे. माळढोक ही पक्षांची प्रजाती नष्टप्राय होत आहे.
केंद्रीय वन मंत्रालयाच्या माळढोक संवर्धन कार्यक्रमांतर्गत जैसलमेर येथील वाळवंटी अभयारण्याच्या परिसरात जीआयबी प्रजनन केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रातील वैज्ञानिकांना अबूधाबी येथील द इंटरनेशनल फंड फॉर होबारा कंजर्वेशन येथे कृत्रिम प्रजननाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीत वैज्ञानिकांनी माळढोक पक्षाच्या कृत्रिम प्रजननाचे अनेक प्रयत्न केले. त्यापैकी बहुतेक प्रयत्न असफल झाले. मात्र, त्या अपयशातून खूप काही शिकता आले, असे हे वैज्ञानिक नमूद करतात.
अखेर सुदा नावाच्या नर माळढोक पक्ष्याचे शुक्राणू टोनी या मादी माळढोक पक्ष्यामध्ये गर्भाधान करण्यात आले. वैज्ञानिकांच्या या प्रयत्नाला यश आले. यशस्वी गर्भधारणेनंतर टोनीने दिलेल्या अंड्यातून 16 ऑक्टोबर रोजी माळढोकच्या पिल्लाचा जन्म झाला. या प्रयोगामुळे वैज्ञानिकांचा उत्साह दुणावला असून दुर्मिळ प्राण्यांच्या संवर्धनासाठी कृत्रिम गर्भधारणेचा मार्ग प्रभावी ठरू शकेल असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे.
Comment List