'आपण राजीनामा दिलेला नाही'
धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण
मुंबई: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
देशमुख यांचे अपहरण आणि हत्या या प्रकरणाच्या पाठीशी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत असून याप्रकरणी मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, ही मागणी जोर धरू लागली आहे. मुंडे यांनी आपल्यावर वारंवार होत असलेल्या आरोपांमुळे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे मंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, मुंडे यांनी त्याचा इन्कार केला.
महायुतीतील सहयोगी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांबरोबरच स्वपक्षीय आमदारांकडूनही मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली जात आहे. अनेक सामाजिक संघटनाही या मागणीवर ठाम आहेत. काल मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची देखील भेट झाली. या बैठकीत पालकमंत्र्यांसह मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. मात्र, जोपर्यंत खुद्द मुंडे यांच्या विरोधात कोणताही पुरावा मिळत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.