'जसप्रीत दुखापतग्रस्त होणे भारतासाठी धक्कादायक'
टीम इंडियाचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांचे मत
मुंबई: प्रतिनिधी
टीम इंडियाचा आघाडीचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीच्या कारणामुळे संघाबाहेर राहणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का असल्याचे मत टीम इंडियाचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले. जसप्रीतने लवकरात लवकर दुखापतीतून बाहेर येऊन मैदानावर उतरावे, अशा शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या.
मागच्या दोन वर्षापासून उत्तम कामगिरी करणाऱ्या जसप्रीतला पाठीच्या खालच्या बाजूला झालेल्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन करंडक स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
दोन वर्षात जसप्रीतने मैदानावर उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. या कालावधीत क्वचितच जगातील इतर कोणत्या गोलंदाजाने त्याच्या एवढी प्रभावी कामगिरी करून दाखवली असेल. जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, अनिल कुंबळे, झहीर खान यांच्यासारख्या सामना जिंकून देणाऱ्या गोलंदाजांनी दुखापतगस्त होणे ही बाब कोणत्याही संघासाठी चिंताग्रस्त करणारी आहे, असे कपिल देव म्हणाले.
फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याच्या संघातील समावेशाचे कपिल देव यांनी समर्थन केले. वरूण हा गुणी गोलंदाज असून त्याची कामगिरी देखील प्रभावी होत आहे. त्याच्यासारख्या रहस्यमय गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूचा संघातील समावेश टीम इंडियाला उपयुक्त ठरू शकतो. त्याची गोलंदाजी समजण्यासाठी आणि ती खेळण्याची तयारी होण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला किती वेळ लागतो, यावर त्याचा प्रभाव निश्चित होणार आहे, असे कपिल देव म्हणाले.
Comment List