'वंचितांचे जगणे सुकर करण्याची जबाबदारी सक्षम घटकांवर'
ममता सिंधुताई सपकाळ यांनी करून दिली जाणीव
पुणे: प्रतिनिधी
समाजातील वंचित घटकांचे जगणे सुकर करण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी काही मोठं बर घटकांवर नव्हे तर संपूर्ण समाजाची असल्याची जाणीव हजारो अनाथांवर मायेची पाखर घालणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी करून दिली आहे.
ममताताई या सिंधुताईंचे कार्य त्यांच्या इतक्यात ममतेने पुढे चालवीत आहेत. संस्थेची सध्या पुण्यातील मांजरी, सासवड, शिरूर, चिखलदरा आणि वर्धा येथे पाच केंद्र कार्यरत आहेत. आपल्या मातोश्री देहाने अंतर्धान पावले असल्या तरी देखील त्यांचा आत्मा अजूनही आपल्या हजारो लेकरांमध्ये वास करून आहे आणि त्याच आपल्याकडून हे कार्य नेटाने करून घेत आहेत, अशी ममताताईंची नितांत श्रद्धा आहे.
समाजातील वंचित घटकांसाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. सरकार देखील विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत असते. मात्र ही जबाबदारी केवळ स्वयंसेवी संस्था आणि सरकारपुरती मर्यादित नाही. त्यांच्या प्रयत्नांना देखील मर्यादा आहे. मात्र, समाजातील सर्व सक्षम घटकांनी या प्रयत्नांना हातभार लावल्यास या प्रयत्नांचा वेग आणि व्याप्ती वाढणार आहे, असे ममताताईंनी नमूद केले.
सिंधुताईंनी मोठ्या कष्टाने आणि धडाडीने उभे केलेले कार्य अधिक व्यापक करण्याचा ममता ताईंचा संकल्प आहे. कल्याण इंडस्ट्रीज आणि पूनावाला फाउंडेशन सारख्या संस्था या कार्याला मोठ्या प्रमाणावर सहकार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे सिंधुताईंनी जोडलेले हजारो लोक आपापल्या परीने या कार्याला मदत करीत आहेत.
यापुढे देखील अधिकारी लोकांनी संस्थेच्या केंद्रांवर यावे. संस्थेचे काम बघावे आणि या कामात सहभाग द्यावा, अशी अपेक्षा ममताताईंनी व्यक्त केली.
संस्थेचे काम सध्या वाढत असून संस्थेला अधिक मोठ्या जागेची आवश्यकता आहे. सर्व केंद्रांमध्ये मिळून सध्या सुमारे तीनशे मुलांच्या निवासाची व्यवस्था आहे. केंद्रांसाठी अधिक मोठ्या जागा उपलब्ध झाल्यास अधिक संख्येने मुलांना सामावून घेता येईल, असे त्या म्हणाल्या.
Comment List