'... याच्यात तर नैतिकतेचा न देखील नाही'

सुप्रिया सुळे यांनी घेतले अजित दादांना फैलावर

'... याच्यात तर नैतिकतेचा न देखील नाही'

मुंबई: प्रतिनिधी

संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिक्रियेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना फैलावर घेतले आहे. मुंडे यांनी वैद्यकीय कारणासाठी राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या राजीनामा पत्रात नैतिकतेचा न देखील नाही, अशा शब्दात सुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. 

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि खुद्द अजित पवार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले. मात्र, सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना मोबाईलवरून मुंडे यांचे राजीनाम्याबद्दलचे ट्विट दाखवून त्यात खरोखरच नैतिकतेचा न देखील नसल्याचे उघड केले. 

संतोष देशमुख मारहाण आणि हत्येची छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत आत्तापर्यंत टोलवाटोलवी करीत असलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मुंडे यांचा राजीनामा घेणे भाग पडले. मुंडे यांच्या राजीनाम्याला विलंब झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये सरकारबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबद्दल रोष निर्माण झाला आहे. खुद्द अजित पवार गटातील नेतेच मुंडे यांचा राजीनामा यापूर्वीच घ्यायला हवा होता, असे दबक्या आवाजात बोलत आहेत. 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us