डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे निधन

शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रावर शोककळा

 डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे निधन

सोलापूर: प्रतिनिधी

ज्ञान प्रबोधिनी सोलापूर, हराळीच्या प्रमुख विश्वस्त, ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ स्वर्णलता भिशीकर (वय ७४) ह्यांचे प्रदीर्घ आजाराने सोलापूर येथे काल रात्री दुःखद निधन झाले आहे. आज मंगळवार ४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता मोदी स्मशानभूमी येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ लता मूळच्या पुणे येथील असून प्रख्यात संपादक चं. प. तथा बापूसाहेब भिशीकर ह्यांच्या कन्या होत. सोलापूर येथील केळकर दांपत्याने बालविकास मंदिर शाळा, ज्ञान प्रबोधिनीकडे हस्तांतरित केल्यावर त्या सोलापूरला स्थायिक झाल्या. ज्ञान प्रबोधिनी पुणेचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब पेंडसे ह्यांची जीवन मूल्ये त्यांनी तरुण वयात आत्मसात केली होती. पुढे शिक्षणतज्ञ व. सी. तथा अण्णासाहेब ताम्हणकर ह्यांच्या नेतृत्वात त्यांनी ज्ञान प्रबोधिनीचे आजीवन कार्य करण्याचे व्रत निभावले.

सोलापूर आणि हराळी येथे भव्य वास्तूंची निर्मिती आणि उत्तम संस्कारसंपन्न तरुण पिढी घडविण्यात त्यांचे अतुलनीय योगदान राहिले आहे. शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूकीची आदर्श प्रथा त्यांनी सोलापुरात यशस्वी करून दाखवली.

सोलापूरला आल्यावर त्यांनी प्रबोधिनीत सत्संग केंद्राची स्थापना केली. स्वरूप संप्रदायाचे स्वामी माधवनाथ ह्यांचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला होता. कर्तव्याशी बांधील राहून खरा परमार्थ कसा करावा ह्याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आचरणात आणला आणि ज्ञानेश्वरी, दासबोध, पतंजली योगसूत्रे ह्यांचेद्वारे नेमके मार्गदर्शन त्या साधकांना करीत असत. पुण्याचे डॉ माधवराव नगरकर तथा स्वामी माधवानंद ह्यांचे प्रमुख उपस्थितीत सत्संग शिबिरे, गुरू पौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात लताताईंचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी लिहिलेली पुस्तके,विविध इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे त्यांच्या विद्वत्तेचे प्रगल्भ दर्शन घडवतात. दिवंगत श्रेष्ठ संत विमलाजी ठकार ह्यांच्या प्रेरणेने मागील आठ दहा वर्षात दोन तीन वेळा त्यांनी संपूर्ण वर्षभर एकांतात अज्ञात स्थळी राहून मौनव्रत स्वीकारून ध्यान सेवा साधना केली होती. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us