तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग खुला
अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळली याचिका
वॉशिंग्टन: वृत्तसंस्था
मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याची प्रत्यार्पणाला विरोध करणारी याचिका अमेरिकेतील न्यायालयाने फेटाळली असून त्यामुळे राणा याला भारतात आणण्याचा मार्ग खुला झाला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी राणा याला भारताच्या अधीन करण्याची घोषणा केली होती.
सन 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा हा असून त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. मुंबईवरील हल्ल्याचा गुन्हेगार म्हणून त्याला भारतात पाठवण्याची मागणी दीर्घ काळापासून केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. या दौऱ्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी राणा याच्या प्रत्यार्पणाबाबत सकारात्मक वक्तव्य केले होते. एक अत्यंत क्रूर गुन्हेगार आपण भारताकडे हस्तांतरित करणार आहोत, असे त्यांनी सूचित केले होते.
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर राणा याने अमेरिकेतील न्यायालयात धाव घेऊन आपल्याला भारतात पाठवू नये अशी विनंती केली होती. आपण पाकिस्तानी मुस्लीम असल्यामुळे भारतात आपल्यावर अन्याय केला जाऊ शकतो. आपली प्रकृती खालावलेली असून आपल्याला पार्किंन्ससन चा आजार आहे, असा दावा राणा यांनी न्यायालयात केला होता.
मात्र, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणा याचे सर्व दावे फेटाळले असून त्यामुळे राणा याच्या भारताकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
Comment List