'यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा कधीही सोडणार नाही'

112 व्या जयंतीच्या निमित्ताने पवार यांचे चव्हाण यांना अभिवादन

'यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा कधीही सोडणार नाही'

सातारा: प्रतिनिधी 

यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राचा पाया घातला. त्यांच्या शिकवणीचा प्रसार करण्याचा आपला प्रयत्न आहे. राजकीय जीवनात कार्यरत असेपर्यंत कधीही यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा आपण सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथील प्रीतीसंगमावर चव्हाण यांना अभिवादन केले. 

यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसरणीने राज्याचे, समाजाचे भले होणार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम या विचारसरणीमुळे शक्य होणार आहे. त्यामुळेच ही विचारसरणी आपण कधीही सोडणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, या देशाचा अभिमान बाळगणारे मुस्लिम देखील देशप्रेमीच आहेत. देशप्रेमी मुस्लिमांची संख्या महाराष्ट्रात खूप मोठी आहे. स्वराज्य स्थापनेसाठी शिवछत्रपतींच्या सैन्यात अनेक मुस्लिम वीरांनी देखील आपले योगदान दिले आहे. त्यामुळे दोन्ही समाजातील नेत्यांनी आपल्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही पवार म्हणाले. 

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच त्वरित मार्गी लावू, असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या  पुनर्वसनासाठी बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us