मंत्रीपद मिळू न देणाऱ्यांना देणार 'असे' चोख प्रत्युत्तर

अखेर व्यक्त झालीच मुनगंटीवार यांच्या मनातील खदखद

मंत्रीपद मिळू न देणाऱ्यांना देणार 'असे' चोख प्रत्युत्तर

मुंबई: प्रतिनिधी 

आपल्याला मंत्रिपद मिळू न देणाऱ्यांना आपण चोख प्रत्युत्तर देणार आहोत. ते देण्याचा मार्ग म्हणजे आमदार म्हणून आपले काम चोखपणे पार पाडणे! त्या दृष्टीनेच आपण प्रयत्नशील आहोत, असा खुलासा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्याच्या मनातील खदखद स्पष्टपणे व्यक्त केली आहे. 

विधानसभा निवडणुकीत महायुतीला गौरवित यश मिळून देखील भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मंत्री पद नाकारण्यात आले. तेव्हापासून मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पक्षाने मुनगंटीवार यांच्याबाबत काही मोठी जबाबदारी देण्याचा विचार करूनच मंत्रीपद दिले नसावे, असे स्पष्टीकरण त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. 

आपल्याला मंत्रीपदापासून दूर ठेवणाऱ्यांना आपल्या कामातूनच उत्तर देण्याचा निर्धार मुनगंटीवार यांनी या मुलाखतीत व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने आपण कंबर कसल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या आपला जिल्हा 10 विभागांच्या शासकीय योजना आणि कामे यांच्या अंमलबजावणीत पहिल्या क्रमांकावर आहे. या कार्यक्षमतेबद्दल आपल्या जिल्हाधिकाऱ्यांचा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान झाला आहे, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले. 

हे पण वाचा  'तुकाराम मुंडे यांना द्या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त पद'

सध्या आपण मिशन ऑलिंपिक 36 आपल्या जिल्ह्यात हाती घेतले आहे. या योजनेनुसार आपल्या जिल्ह्यात ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू घडविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, असेही मुनगंटीवार म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत स्वतःहून पराभूत झाल्याचा आरोप 

आपल्याला लोकसभा निवडणूक लढविण्यात रस नसल्याचे आपण तिकीट वाटपापूर्वी स्पष्ट केले होते. मात्र, ज्यावेळी आपली उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी पूर्ण तयारीने आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो उन्हातानात हिंडून प्रचार केला.  तरीही आपल्यावर या निवडणुकीत स्वतःहून पराभूत झाल्याचा आरोप केला जात आहे, असा गौप्यस्फोट मुनगंटीवार यांनी या मुलाखतीत केला आहे. कोणता उमेदवार स्वतःच स्वतःचा पराभव करून घेईल, असा सवालही मुनगंटीवार यांनी केला. 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us