नागपूर दंगल सरकारपुरस्कृत आहे म्हणावे का?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते शरद गोरे यांचा सवाल
पुणे: प्रतिनिधी
मागील काही काळापासून महायुतीतील काही नेते सातत्याने चिथवणीखोर वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन दंगलीला चिथावणी देणारे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे नागपूर येथे नुकत्याच झालेल्या दंगलीला सरकार पुरस्कृत दंगल म्हणावे काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते डॉ. शरद गोरे यांनी केला आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे सरकारचे काम आहे. प्रत्यक्षात सरकारमधील काही मंत्री आणि इतर नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून दंगलीस उत्तेजन देत आहेत आणि सरकार त्याकडे केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे या दंगली सरकार पुरस्कृत आहेत का, असा संशय निर्माण झाला आहे, अशी टीका डॉ. गोरे यांनी केली.
राज्यात अशांततेचे वातावरण म्हणजे विद्यमान सरकारचे अपयश आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना सरकार चालवण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी सरकार मधून बाहेर पडून सामान्य जनतेस दिलासा द्यावा, असेही डॉ.शरद गोरे म्हणाले.
Comment List