'... तर गाठ आमच्याशी आहे'
धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांचा इशारा
बीड: प्रतिनिधी
रायगडावरील वाघ्या श्वानाच्या पुतळ्याला आणि समाधीला हात जरी लावाल तरी गाठ आमच्याशी आहे, असा इशारा धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे. हा पुतळा हटवण्यासाठी अंतिम मुदत म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीचा दिवस निवडून या दिवशी महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा आपला हेतू आहे काय, असा सवालही त्यांनी केला आहे.
सध्या महाराष्ट्रात आरक्षण आणि अन्य मुद्द्यावरून जातीय अस्मिता टोकदार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता वाघ्याच्या समाधीचा मुद्दा पुढे आला आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी शिवचरित्रात वाघ्या या श्वानाचा कोणताही उल्लेख नसल्याचा दावा केला आहे. वाघ्या श्वान हे काल्पनिक पात्र आहे. त्यामुळे शिवछत्रपतींच्या समाधी जवळ असणारी वाघ्याची समाधी हटवावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी 31 मे ही अंतिम मुदत दिली आहे.
छत्रपती संभाजीराजे आपली प्रतिष्ठा पणाला लावून वाघ्या या श्वानाचा पुतळा काढण्यासाठी आग्रह का करीत आहेत, असा सवाल करतानाच बाळासाहेब दोडतले यांनी मराठ्यांच्या इतिहासात वाघ्याचे महत्त्वाचे योगदान असल्याचा दावा केला आहे. केवळ होळकर यांनी या समाधीचा जीर्णोद्धार केला म्हणून हा मुद्दा पुढे करीत आहात का, असा सवालह त्यांनी केला.
रायगडावर तुमची मक्तेदारी नाही. राज्यात असंतोष निर्माण करण्याचे काम करू नका, असा इशाराही दोडतले यांनी छत्रपती संभाजी राजे यांना दिला आहे. वाघ्याच्या समाधीला हात लावण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाज रायगडाकडे कूच करेल. वाघ्याच्या स्मारकाला हात लावणे तर दूरच, आम्ही तुम्हाला तिथपर्यंत पोहोचू देखील देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
छत्रपती संभाजी राजे आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी महाराष्ट्रात अशांतता निर्माण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.