विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अण्णा बनसोडे यांची उमेदवारी
महायुती नेत्यांच्या उपस्थितीत सादर केला अर्ज
मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत हे महायुतीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.
विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अण्णा बनसोडे यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब करण्यात आले. अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा ते निवडून आले आहेत.
लवकरच महापालिका निवडणुकांची घोषणा होणार असून त्यादृष्टीने भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील पिंपरी चिंचवड महापालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने अण्णा बनसोडे यांना विधानसभेचे उपाध्यक्ष पद मिळणे हे पिंपरी चिंचवड मधील पक्ष कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.