'योग्य, अयोग्याच्या पलिकडे जाऊन सामोपचाराने...'
वाघ्या श्वान समाधीबाबत होळकर कुटुंबीयांची भूमिका
पुणे: प्रतिनिधी
वाघ्या श्वानाच्या समाधीचा प्रश्न दोन्ही बाजूंसाठी अस्मितेचा बनला असून त्यातून सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी शासनाने इतिहासकारांची समिती स्थापन करावी आणि त्यांच्यामार्फत सन्मान्य तोडगा काढावा. त्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांच्यासह आपण देखील सहकार्य करू, अशी भूमिका होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
वाघ्या श्वान अस्तित्वात होते की नाही याबाबत आपण कोणतेही भाष्य करणार नाही. तो इतिहासकारांचा प्रांत आहे. मात्र, वाघ्याची समाधी हा प्रश्न ती हटवावी म्हणणारे आणि त्याला विरोध करणारे अशा दोन्ही बाजूंचा अस्मितेचा प्रश्न बनला आहे. वास्तविक सध्याच्या काळात हा प्रश्न महत्त्वाचा नाही. तरी देखील समाजात तेढ उत्पन्न होऊ नये, यासाठी आपण आपली भूमिका मांडत असल्याचे होळकर यांनी स्पष्ट केले.
दोन्ही बाजूंच्या भावनांचा सन्मान राखला जावा आणि याप्रकरणी सामोपचाराने तोडगा निघावा, यासाठी राजकारण्यांना दूर ठेवून केवळ इतिहास अभ्यासकांची समिती नेमली जावी. या समितीने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन दोन्ही बाजूंना मान्य असेल असा तोडगा काढावा, अशी विनंती आपण मुख्यमंत्री, राज्य शासन, पुरातत्व विभाग यांना करणार आहोत. या प्रयत्नांमध्ये छत्रपती संभाजी राजे यांच्यासह आपलाही सहभाग असेल, असे भूषणसिंहराजे होळकर यांनी सांगितले. ही समिती जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्राने उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
होळकर घराण्याची बदनामी थांबवा
होळकर घराण्याने शेवटपर्यंत इंग्रजांशी लढा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती घराण्याचा कायम आदर केला आहे. काही जण मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर यांच्यासह होळकर घराण्यातील महिलांची नावे पुढे करून होळकर घराण्याची बदनामी करीत आहेत. ही बदनामी थांबवा, असा इशाराही भूषणसिंहराजे होळकर यांनी, होळकर इंग्रजांना घाबरत होते, असा दावा करणाऱ्यांना दिला आहे.
महाराष्ट्राची सामाजिक वीण बिघडवू नका
छत्रपती शिवस्मारकासाठी महात्मा फुले, लोकमान्य टिळक, तुकोजी होळकर ही मंडळी पुढे आली. कारण त्या काळातला महाराष्ट्र हा जातीपातीच्या पलीकडचा होता. आता जातीपातीत अडकून महाराष्ट्राची सामाजिक वीण बिघडवू नका, असे आवाहन देखील भूषणसिंहराजे होळकर यांनी केले. वाघ्या श्वानाच्या समाधी बाबत कोणताही अनुचित प्रकार घडू देऊ नये, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.