सत्य घटनेवर आधारित शातिर या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
गुन्हेगाराला इशारा देणारी अॅक्शन पॅक्ड नायिका 23 मे रोजी येतेय
'… तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल, असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा शातीर चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर नुकताच लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली जाणार आहे. शातिर The Beginning हा मराठी चित्रपट येत्या 23 मे रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
सध्याच्या तरुणाईची कथा सांगणारा, सत्यकथेवर आधारित शातीर, द बिगिनिंग या चित्रपटाची निर्मिती श्रियांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे. या चित्रपटा द्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सध्याच्या तरुण पिढीला पडलेला अमली पदार्थांचा विळखा, ड्रग्स माफिया आणि पोलीस यंत्रणेच्या संघर्ष, व्यसनाधीनता, गुन्हेगारी यांच्याविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले, शातिर The Beginning माझा दिग्दर्शक म्हणुन पाहिलाच प्रयत्न आहे. समाजातील अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी त्या विरुद्धचा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
चित्रपटाच्या निर्मात्या, अभिनेत्री रेश्मा वायकर म्हणाल्या, चित्रपटातील 'पोरी आम्ही मराठी पोरी' या गीताला मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणारा आहे. आज आपल्या समाजात अंमलीपदार्थ सहजतेने मिळत आहेत, ते घेणाऱ्या तरुणाईचे प्रमाण वाढत आहे, विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर अशाच प्रकरणामुळे मधल्या काळात चर्चेत होते. या दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध लढा देणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईची ही कथा आहे. अॅक्शन पॅक्ड अशी नायिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते.
शातिर The Beginning या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून योगेश सुमन, रमेश परदेशी, मीर सरोवर, रामेश्वर गीते, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला रोहित नागभिडे यांचे संगीत असून वैभव देशमुख गीतकार आहेत. चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरसाज चढवला आहे.
सत्यघटनेवर आधारित, तरुणाईतील ड्रग्ज, व्यसनाधीनता असा संवेदनशील विषय घेऊन येणार, सस्पेन्स थ्रीलर असलेला शातिर The Beginning हा मराठी चित्रपट येत्या 23 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.