महाराष्ट्राचे राज्यपाल रालोआचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार
जे पी नड्डा यांनी केली सी पी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहेत. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
राधाकृष्णन हे भाजपचे तामिळनाडू येथील ज्येष्ठ नेते आहेत. ते तब्बल चार दशके राजकारणात सक्रिय आहेत. कोइंबतूर लोकसभा मतदारसंघात ते दोन वेळा निवडून आले होते. सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. यापूर्वी त्यांनी झारखंडचे राज्यपाल पदही भूषविले आहे.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काही दिवसांपूर्वी अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यासाठी त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले आहे. मात्र, त्यांचा राजीनामा विवादास्पद ठरला असून तो त्यांच्यावर दबाव टाकून घेण्यात आल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. दुसरीकडे धनखड यांनी गुप्तपणे विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा आरोपही होत आहे. राजीनामा दिल्यानंतर ते बेपत्ता असल्याबद्दलही विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टीकेचे लक्ष्य करत आहेत.