- राज्य
- 'रेड अलर्ट चे पत्र काढून राज्य सरकारची जबाबदारी संपली का?'
'रेड अलर्ट चे पत्र काढून राज्य सरकारची जबाबदारी संपली का?'
शिवसेना ठाकरे गटाकडून प्रश्नांची सरबत्ती
मुंबई: प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई जलमय झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. हवामान विभागाकडून इशारा आल्यानंतर रेड अलर्टचे पत्रक काढले म्हणजे सरकारची जबाबदारी संपली का, असा सवाल त्यांनी केला आहे.
पाऊस सुरू झाला की लोक काळजी घेतातच. मात्र, या पावसाळ्यात मुंबई दोनदा पाण्यात बुडाली याला जबाबदार कोण? लोकांना सावध राहायला सांगणाऱ्या सरकारने मुंबई जलमय होऊ नये म्हणून काय काळजी घेतली? रस्त्यांवर वाहतूक सुरळीत राहावी, लोकल सेवा ठप्प होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या? सर्व रस्ते ठप्प होत असताना सरकार आणि महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग काय करत होता, असे सवाल ठाकरे गटाकडून करण्यात आले.
मुंबईला तीन तीन पालकमंत्री आहेत. मुंबई पाण्याखाली जात असताना ते काय करत होते? कबुतरांच्या वादात फारच सक्रिय झालेल्या पालकमंत्र्यांनी या वेळी काय केले? आपल्या मिंधे सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे झाकण्यासाठी सतत दिल्लीवारी करणारे उपमुख्यमंत्री कुठे होते? मुख्यमंत्री आपत्ती व्यवस्थापन कक्षातून लोकांना सावध राहायला सांगून आपली जबाबदारी झटकू पहात आहेत का; असेही सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आले.