- राज्य
- गणेश विसर्जनामुळे हजरत पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी
गणेश विसर्जनामुळे हजरत पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी
सामाजिक सलोखा ठेवून पुणे सीरत कमिटीचा एैतिहासिक निर्णय
पुणे : प्रतिनिधी
मुस्लिम धर्मीयांसाठी महत्वपूर्ण असलेली हजरत महंमद पैंगबर यांची जयंती यंदाच्या वर्षी ५ सप्टेंबरला असली तरी याच दिवशी गणेश विसर्जन असल्याने धार्मिक सलोखा राखण्यासाठी पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे सिरत कमिटीने घेतला आहे. सिरत कमिटीच्या या निर्णयाचे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वागत करत कमिटीचे आभार व्यक्त केले आहेत.
आज पुणे पोलीस अधिकारी आणि सिरत कमिटी पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली या बैठकीत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त भाजीभाकरे व सीरत कमिटीचे मौलाना जमिरुद्दीन, रफिउद्दीन शेख, सिराज बागवान, असिफ शेख, जावेद खान, आबीद सय्यद, अन्सार पिंजारी, मौलाना खालिद निजामी इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.
सीरत कमिटीच्या वतीने हजरत महंमद पैगंबर जयंतीची मिरवणूक ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता पारंपरिक मिरवणूक काढन्यात येणार आहे. सिरत कमिटीच्या या निर्णयाचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. हा निर्णय खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असून सध्या जाती धर्मातील दरी रुंदवण्याचे प्रयत्न सुरू असताना या निर्णयामुळे पुणे सिरत कमिटीने सामाजिक सलोख्याचा वस्तुपाठ घालून दिल्याची भावना व्यक्त होत आहे.
मागील वर्षीपासून हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक कानठळ्या बबसवणारा डीजे आणि डोळ्यांना इजा पोहोचविणारे लेझर लाईट न वापरता काढण्याचा समाजोपयोगी निर्णय देखील पुणे सीरत कमिटीने घेतला आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मुस्लीम संस्था संघटनांनी त्याचे काटेकोर पालन केले.