प्रसंगावधान राखत जैनकवाडी येथे सांडव्यातील पाण्याचा अडथळा दूर करुन मार्ग केला मोकळा
बारामती : तालुक्यात दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जैनकवाडी पाझर तलाव पूर्ण भरून धोक्याची पातळी निर्माण झाली होती, प्रसंगावधान राखत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सांडव्यातील अडथळा दूर करुन पाण्याचा मार्ग मोकळा केल्याने मोठा अनर्थ टळला, अशी माहिती गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी दिली.
स्थानिक शेतकऱ्यांनी सांडव्यातून पुढे जाण्यासाठी ३ फूट उंच रस्ता केला होता. त्यामुळे पाणी बाहेर पडण्यासाठी अडचण होत होती. तलावात पाण्याची पातळी खूप वाढू लागल्याने तलाव फुटण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी सपंर्क साधला. त्यावर ग्रामपंचायत अधिकारी अतुल गरगडे यांनी जेसीबीद्वारे अडथळा दूर केला.
यामुळे ग्रामपंचायत पाणी पुरवठा विहीर, सुमारे ५० घरे आणि परिसरातील शेतजमिनी, शेतमाल, घरासोबतच पशुधनाचे नुकसान टाळता आले, अशी माहिती डॉ. बागल यांनी दिली आहे.
इंदापूरमधील चिखलीत प्रशासनाला युवकांची साथ चिखली (ता. इंदापूर) या गावात बारामती- कळंब -बावडा मार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. त्यावेळी तेथे नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, ग्राम महसूल अधिकारी गोरख बारवकर, स्थानिक ग्राम महसूल सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायतचे सरपंच व गावातील युवकांनी सदर बाधित कुटुंबे जिल्हा परिषद शाळा येथे स्थलांतरित केली. रस्ता बंद झाल्यामुळे तेथून जाणारे अंदाजे २०० प्रवाशांची राहण्याची व जेवणाची सोय संबंधित सरपंच व गावातील नागरिकांनी केली.
२३ ते २५ मे दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे निरा नदी तसेच ओढ्यांना पूर आला. त्यामुळे ओढे व नदीलगत लोकवस्तीमध्ये पुराचे पाणी अचानक घरामध्ये घुसून अंदाजे ५० गावांमधील १ हजार ७५५ कुटुंबे बाधित झाली. सदरची कुटुंबे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली.
त्यासाठी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डोईफोडे, सर्व महसूल मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्राम महसूल सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील यांच्या मदतीने काम करण्यात आले.
जांब येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन मजुरांची तेथील पोलीस पाटील व नागरिकांनी अथक परिश्रम करून सुटका केली आहे. निरवांगी येथे निरा नदीकाठी असलेल्या नंदिकेश्वर मंदिरातील एका वृद्ध व्यक्तीची सुटका केली. ही कुटुंबे बाहेर काढताना ग्राम महसूल अधिकारी व पोलीस पाटील यांनी स्पीड बोट वापरून जीवावर उदार होऊन धैर्याचे काम केले.
000