“जुन्नरचे दुर्ग वैभव” व “जुन्नर पर्यटन मार्गदर्शिका” या ग्रंथांचे प्रकाशन
On
नारायणगाव, किरण वाजगे
ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथील प्रा, डॉ. श्रीकांत फुलसुंदर आणि प्रा, डॉ. लहू गायकवाड लिखित व सनय प्रकाशन नारायणगाव निर्मित ग्रंथाचे प्रकाशन एवरेस्ट वीर श्रीहरी तापकीर, दुर्ग संवर्धन चळवळीचे प्रमुख मिलिंद क्षीरसागर, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहेर, विश्वस्त प्रकाश पाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नारायणगाव येथे नुकतेच करण्यात आले.
या ग्रंथाबरोबरच स्थानिक इतिहास लेखन आणि बी के आपटे संपादित छत्रपती शिवाजी महाराज याही ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी यांनी दिली.
प्रकाशन समारंभासाठी अरविंद मेहेर, अमित बेनके, सुखदेव बनकर, डॉ. के एल गिरमकर, डॉ.जगदीश सोनवणे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
मुख्य अतिथी मिलिंद क्षीरसागर म्हणाले, जुन्नर तालुक्याच्या दुर्गसंवर्धन चळवळीमध्ये महाविद्यालयाचा सक्रिय मोठा वाटा आहे. मागील बारा वर्षापासून त्यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दुर्ग संवर्धनाची केलेल्या कामाची पावती म्हणजे साकारलेला हा ग्रंथ होय. हा ग्रंथ केवळ दुर्गसंवर्धन नाही तर या ग्रंथात दुर्गांचा इतिहास सद्यस्थिती आणि महाविद्यालयाने केलेल्या प्रयत्नांची ही जंत्री आहे.
एवरेस्ट वीर श्रीहरी तापकीर म्हणाले की आम्ही अनेक किल्ले पाहिले, मात्र किल्ला कसा पहावा आणि कसा वाचावा हे या पुस्तक वाचनाने समजले. या पुस्तकामध्ये केवळ किल्ल्याचा आणि दुर्ग संवर्धनाचा इतिहास नाही तर किल्ल्यांचा आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक एक कालपट उलगडून दाखविला आहे.किल्ला कसा पहावा याची माहिती या ग्रंथात दिली आहे. प्रत्येक वाचकाच्या संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ आहे. 'जुन्नरचे दुर्गवैभव' व 'जुन्नर पर्यटन मार्गदर्शिका' च्या माध्यमातून पर्यटना बरोबर दुर्ग संवर्धनामुळे जुन्नर तालुक्याची ओळख निर्माण होणार असल्याचे एव्हरेस्ट वीर श्रीहरी तपकीर यांनी आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहेर म्हणाले. गुरुवर्य राजाराम परशुराम सबनीस यांनी लावलेल्या शिक्षण संस्थेचा आज वटवृक्ष होत आहे. या संकुलामध्ये काम करणारा शिक्षक हा आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असला पाहिजे. गुरुवर्य सबनिसांनी घालून दिलेल्या शिकवणीप्रमाणे येथील प्रत्येक जण चालत आहे. सामाजिक बांधिलकीचा वारसा जपण्याच्या अनुशंगाने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने मागील बारा वर्षांमध्ये जे काम दुर्ग संवर्धनासाठी केले आहे त्याची नोंद या ग्रंथात घेतली आहे.
जुन्नरचे दुर्ग वैभव आणि जुन्नर तालुका पर्यटन मार्गदर्शक पुस्तिका हे दोन ग्रंथ म्हणजे जुन्नरच्या पर्यटन ग्रंथ विश्वामध्ये भर घालणारे आहेत. महाविद्यालयातील डॉ. फुलसुंदर आणि डॉ. गायकवाड यांनी पर्यटनाच्या आणि दुर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात उत्तम काम केले आहे. गडकिल्ले ,दुर्ग संवर्धनाचे काम करताना राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या माध्यमातून श्रमदान, जाणीव जागृती, वृक्ष संवर्धन रस्ता दुरुस्ती ,पाण्याच्या टाक्या स्वछता, इतिहास लेखण, पर्यटन सहली, शिबिरे इ.उपक्रम राबविल्याने या पुस्तकांच्या निर्मितीला चालना मिळाल्याचे डॉ.श्रीकांत फुलसुंदर यांनी लेखकाच्या मनोगतातून सांगितले.
कार्यक्रमांमध्ये जगदीश सोनवणे व के एल गिरमकर यांनी ग्रंथाबद्दलच्या वाचक प्रतिक्रिया दिल्या. यावेळी राजश्री बोरकर, मंदाकिनी दांगट, चंद्रकांत वऱ्हाडी, सुरेश वऱ्हाडी, पंढरीनाथ चौरे, विनायक खोत, जालिंदर डोंगरे, भालचंद्र वामन, बाळासाहेब कानडे, के.बी.वाघमारे, डॉ. शरद कापले, डॉ. दिलीप शिवणे, डॉ.सदानंद राऊत, रमेश मेहेर, जितेंद्र बिडवई, वैशाली फुलसुंदर, छाया गायकवाड, किरण वाजगे, हेमंत महाजन, मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव इ. विवीध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच जुन्नर तालुक्यातून पत्रकार, अभ्यासक, संशोधक, दुर्गसंवर्धक आणि बौद्धिक क्षेत्रात काम करणारा वाचक श्रोता वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहबूब काझी आणि डॉ. वैशाली मोढवे यांनी केले. शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.
000
Tags:
About The Author
Latest News
29 May 2025 19:12:03
नारायणगाव
नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ नये तसेच ते वारूळवाडी गावच्या हद्दीतच राहावे यासाठी वारूळवाडी येथे उपोषण सुरू...