सहाय्यक लेखाधिकार पदोन्नती परीक्षा रद्द करा
साताऱ्यात संघटनेच्या सभेत एकमुखी मागणी
सातारा : सहाय्यक लेखाधिकारी पदोन्नतीसाठीची एमएफअेएस असणारी परीक्षा कायमस्वरुपी रद्द करण्यात यावी, अशा एकमुखी मागणीसह, खुल्लर समिती वेतन त्रुटी अहवालाचा निषेध महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना १४२५ ची राज्यस्तर कार्यकारिणी विशेष सभेत व्यक्त करण्यात आला. ही सभा लेखा संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
लेखा कर्मचारी संघटनेची राज्य कार्यकारिणी विशेष सभा झेडपीच्या छ. शिवाजी सभागृहात रविवारी उत्साहात संपन्न झाली. या सभेस राज्यभरातील २६ हून अधिक जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच ही सभा असल्याने या सभेस विशेष महत्त्व होते. या सभेत राज्य शासनाच्या धर्तीवर सहाय्यक लेखाधिकारी पदोन्नतीसाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र जिल्हा परिषद वित्त व लेखा सेवा वर्ग ३ (टऋअर) परीक्षा रद्द करणे, १०, २०, ३० वर्षाच्या सेवेनंतर मिळणारा आश्वासित प्रगती योजना लाभ देताना परीक्षा उत्तीर्ण अट काढणे, संघटनेला औद्योगिक व कामगार न्यायालयाची मान्यता घेणे, वेतन त्रुटी नागपूर कोर्ट केस पाठपुरावा करणे, सहाय्यक लेखाधिकारी ते लेखाधिकारी पदोन्नतीसाठी पाठपुरावा करणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची कनिष्ठ लेखाधिकारी पदे पुनर्जिवीत करणे आदी विषयांवर चर्चा होऊन ठराव संमत करण्यात आले. या सभेमुळे लेखा कर्मचाऱ्यांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी गती मिळाली आहे.
या सभेत संघटनेला सहकार्य केल्याबद्दल जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जि. प. मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच सातारा जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ काटकर तसेच जि. प. लेखा संवर्गात सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सभेस राज्य संघटनेचे सरचिटणीस प्रशांत सुतार, कोषाध्यक्ष चंद्रशेखर फसाळे, कार्याध्यक्ष पवन तलवारे, विभागीय उपाध्यक्ष तसेच विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी यांच्यासह सुमारे २५० हून अधिक पदाधिकारी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक रवींद्र बोरकर यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय खराडे यांनी केले. आभार विजय कुंभार यांनी मानले.
00000000000000000