आपत्ती काळात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे - तहसीलदार अनंत गुरव
पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी कोयना नदीपात्रात बोटिंगचे प्रशिक्षण
पाटण : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या काळात सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पाटणमधील स्थानिकांसह महसूल, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना बोटी चालवण्याबाबत येथील कोयना नदीपात्रात प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अनंत गुरव, नायब तहसीलदार पंडित पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास माने, एनडीआरएफ इस्पेक्टर एस. के, पासवात यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार गुरव म्हणाले, तालुक्यातील पर्जन्यमान तसेच कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना, केरा नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली जाते. कोयना काठासह पाटणमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरते. घरांना पाण्याचा वेढा पडल्याने अनेकजण घरातच अडकून पडतात. केरा पुलानजीक असणारा पशुवैद्यकीय दवाखाना, स्मशानभूमी परिसर, केरा पुलापासून ते जुने बसस्थानक, झेंडा चौक, धांडे पूल, नवीन बसस्थानक, कळके चाळ, रामापूर, ग्रामपंचायतीची जुनी इमारत, मार्केट यार्ड असा सर्व परिसर पुराच्या पाण्याखाली जातो. अशा परिस्थितीत लोकांना बाहेर काढताना प्रशासकीय यंत्रणेला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी मॉन्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून पाटणमधील स्थानिकांना कोयना नदीत बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आपत्ती काळात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. पावसाळ्यात अशाप्रकारे आपती उद्भवल्यास या बोटीमुळे नागरिकांना बाहेर काढणे सोयिस्कर होणार आहे. तहसील कार्यालयात २४ तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला असून आपत्तीची माहिती या ठिकाणी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास माने यांनीही उपस्थितांना पूरपरिस्थितीच्या काळात कशाप्रकारे सामना करावा याबाबतची माहिती दिली. यावेळी पाटण येथील कोयना नदीपात्रात प्रत्यक्षपणे नावडी येथील नागरिक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, पाटण नगरपंचायतीचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांना आपत्ती व्यवस्थान समितीच्या एनडीआरएफ टीमकडून बोट चालविण्याचे प्रशिक्षण व सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
प्रशिक्षणाप्रसंगी पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे, नगराध्यक्षा सौ. अनिता देवकांत, नगरसेवक उमेश टोळे, येराडचे मंडलाधिकारी रंगनाथ असवले, पाटणचे शिवाजी लुगडे व के. टी. वाघमारे, मारूल हवेलीचे मंडलाधिकारी शशिकांत बोबडे, पंढरीनाथ शिंदे, रसिका माने, अक्षय जाधव, महसूल सहाय्यक कुबेर, शशिकांत देवकांत, मिलिंद पाटील, दर्शन कवर यांच्यासह नगरपंचायतीचे कर्मचारी, महसूलचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
0000