बांधकाम मंत्र्यांच्या उपस्थितीत मेढा शाळेत होणार शाळा 'प्रवेशोत्सव'
मेढा : जावळी तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा मेढा येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत सोमवारी १६ जुन रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे या दिमाखदार प्रवेशोत्सवासाठी पीएम श्री मेढा शाळा सज्ज झाली आहे.
"शाळा म्हणजे फक्त इमारत नव्हे... ती असते स्वप्नांची पहिली पायरी आणि त्या पायरीवर पहिलं पाऊल टाकणारे लाडके चिमुकले!" या लाडक्या चिमुकल्यांचा शाळेत पदार्पण होताना आनंद उत्सव द्विगुणित करण्यासाठी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले उपस्थित राहणार आहेत
१६ जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून, शिक्षण विभागाची यानिमित्ताने जय्यत तयारी सुरू आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून, शाळांचा परिसर सजविण्यासोबत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी, पुस्तके तसेच गणवेश वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर एकही बालक शालाबाह्य राहणार नाही याची काळजी देखील गट शिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी घेतली आहे.
जावली तालुक्यातील जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील असे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे आहे.
६ ते १४ वयोगटातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये, यासाठी प्रवेश पात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रवेश पात्र बालकांची यादी लाऊडस्पीकरवर घोषित करून शैक्षणिक पदयात्रा व शिक्षकांच्या गृहभेटी सरपंच, गावकरी, व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचतगट, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वाच्या गृहभेटींचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी स्वागत करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ना शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी नगराध्यक्ष पांडूरंग जवळ,अनिल शिंदे, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार, विकास देशपांडे नगरपंचायतीचे सर्व माजी नगरसेवक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक तोडकर, सचिन करंजेकर, केद्रप्रमुख मिलन मुळे , विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा मेढा येथे स्वागत करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.तसेच शहरातून प्रभातफेरी काढण्यात येणार असून प्रभातफेरीत युवक, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होण्याची विनंती शाळेच्या वतीने करण्यात आली आहे. वर्षभर १०० टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती देणे तसेच एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही अशी उपस्थितांसह प्रतिज्ञा देखील घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजना सपकाळ यांनी यावेळी दिली.
00000000000000