- राज्य
- रॅगिंग प्रकरणी तीन विद्यार्थी डॉक्टरांचे निलंबन
रॅगिंग प्रकरणी तीन विद्यार्थी डॉक्टरांचे निलंबन
सहा महिन्यांसाठी प्रवेश बंदी आणि एक लाख रुपयांचा दंड
पुणे: प्रतिनिधी
नामांकित बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरणी तीन विद्यार्थी डॉक्टरांचे सहा महिन्यांसाठी, अर्थात अभ्यासक्रमाच्या एका सत्रासाठी निलंबन करण्यात आले असून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रॅगिंग प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या सत्यशोधन समितीच्या शिफारसीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
बी जे वैद्यकीय महाविद्यालयात ऑर्थोपेडिक्स विभागात एम एसच्या अभ्यासक्रमासाठी पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दुसऱ्या वर्षातील डॉक्टर रॅगिंग करत असल्याची तक्रार एप्रिल महिन्यात केली होती. मात्र, आपले विभाग प्रमुख, ससून रुग्णालयाचे अधीक्षक यांच्यापैकी कोणीही त्याची दखल घेतली नाही, अशी त्याची तक्रार होती. त्यामुळे त्याच्या पालकांनी थेट मंत्रालयात धाव घेतली.
मंत्रालयातून चक्र फिरल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी रॅगिंग सत्यशोधन समिती नियुक्त करण्यात आली. या समितीत सुमारे 15 जणांचा सहभाग होता. या समितीने चौकशी करून डॉ. अथर्व घोरपडे, डॉ. गौरव तिवारी आणि डॉ. राहुल जाधव या तिघा निवासी डॉक्टरांनी संबंधित विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब केले. या समितीने केलेल्या शिफारशनुसार या तिघांवर महाविद्यालय परिसरात सहा महिने प्रवेश बंदी, कोणत्याही शैक्षणिक उपक्रमात अथवा परिसंवादात उपस्थित राहण्यास बंदी आणि प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.