मुंबई / रमेश औताडे
शेवगा, म्हणजेच मिरॅकल ट्री! या वनस्पतीचे औषधी गुणधर्म सर्वश्रुत आहेत. ग्रामीण भागात शेवग्याच्या शेंगांची लागवड ही केवळ शेती नव्हे तर पोषणाची चळवळ बनली आहे. अनेक शेतकरी आता शेवग्याच्या शास्त्रीय पद्धतीने लागवडीकडे वळत आहेत.
"एकदा लावलं की तीन-चार वर्षांपर्यंत सातत्याने उत्पादन मिळतं," असं सांगत, प्रगतिशील उच्चशिक्षित शेतकरी संजय रावसाहेब सुरवसे यांनी या संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली.उन्हाळ्याच्या सुरुवातीला शेंगांची भरघोस मागणी असते. मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमध्ये याला चांगला बाजारभाव मिळतो. हे केवळ अन्न नाही, तर आरोग्यवर्धक आहार आहे.
कॅल्शियम, आयर्न आणि जीवनसत्त्वांचा भरपूर स्रोत असलेली ही शेंग ग्रामीण भागातून परदेशातील ग्राहकांपर्यंत पोचली आहे. शेवगा व त्याची पाने याबाबत बोलायचे म्हटले तर एक पुस्तक तयार होईल. शेवग्याची पाने तर खूप महत्वपूर्ण आहेत. त्याची पावडर आज अनेक औषधात वापरून औषध कंपन्या करोडो रुपये मिळवत आहेत.
शेवग्याच्या शेंगांचा हा प्रवास म्हणजे एका झाडातून उगम पावलेली चव आणि आरोग्याची गोष्ट. शेतकरी आणि ग्राहक यांना एकत्र आणणारा एक समृद्ध शेंगांचा पूल आहे असे म्हंटले ते वावगे ठरणार नाही असे त्यांनी सांगितले.
000