'सलीम जावेद च्या कहाण्या आता बंद करा'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवार आणि राहुल गांधींवर टीका
मुंबई: प्रतिनिधी
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सलीम जावेद यांच्या फिल्मी कहाण्यांप्रमाणे रचलेल्या कहाण्या लोकांना सांगत आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भर पडली आहे. त्यांनी आता सलीम जावेदच्या कहाण्या सांगणे बंद करावे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी व शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
शरद पवार यांनी निवडणुकीपूर्वी आपल्याला मतांमध्ये फेरफार करून 160 जागा जिंकून देण्याची खात्री देणारे दोघेजण भेटले होते, असा दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना फडणवीस यांनी त्यांच्यावर कठोर टीका केली आहे.
तुम्ही जबाबदार नागरिक आहात. निवडणूक प्रक्रियेत काही गैरप्रकार घडण्याची शक्यता लक्षात येताच तुम्ही निवडणूक आयोगाने पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती, असे फडणवीस म्हणाले. त्या लोकांचा वापर करायचा तुमचा विचार होता का, असा सवालही त्यांनी केला.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील या प्रकाराबाबत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. वास्तविक पवार यांनी या दोघांना घेऊन मतांमध्ये फेरफार करण्याचा प्रयोग करायला हवा होता, असे मुश्रीफ म्हणाले. राहुल गांधी अनेक दिवसांपासून मत चोरी होत असल्याचा आरोप करीत आहेत. मात्र, त्या कोणतेही तथ्य आढळून येत नाही.
बिहार निवडणुकीसाठी केलेला स्टंट
कच्च्या निवडणूक याद्या प्रसिद्ध होतात. त्यावर आक्षेप घेण्यास वाव असतो. कोल्हापूर जिल्ह्यात मतदार यादीत घोटाळा असल्याचा एकही आक्षेप घेण्यात आलेला नाही, असा दावा मुश्रीफ यांनी केला. असल्या तक्रारी करून राहुल गांधी संसदेचा, निवडणूक आयोगाचा वेळ वाया घालवत आहेत. यातून निष्पन्न काहीही होणार नाही. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ते हा स्टंट करत आहेत, असा दावा मुश्रीफ यांनी केला.
शरद पवारांचे वरातीमागून घोडे
मतदार यादीमधील घोटाळे आणि एकूण निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींबाबत आपण सर्व पक्ष मिळून न्यायालयाकडे दाद मागू, असे आपण यापूर्वी अनेकदा सगळ्यांनाच सांगितले आहे. त्यावेळी कोणीही आपल्याला साथ दिली नाही. आता शरद पवार यांनी केलेले विधान हे वरातीमागून घोडे आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.