- राज्य
- 'भारत काँग्रेस मुक्त करतानाच भाजप झाला काँग्रेस युक्त'
'भारत काँग्रेस मुक्त करतानाच भाजप झाला काँग्रेस युक्त'
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला
मुंबई: प्रतिनिधी
देशाला काँग्रेसमुक्त करता करता भारतीय जनता पक्ष स्वतःच कधी काँग्रेस युक्त झाला, हे त्यांना देखील कळले नाही, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.
इतर पक्षातून भाजपमध्ये होणारे इन्कमिंग पाहता, आगामी काळात तुम्ही विरोधी पक्ष शिल्लक ठेवणार की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, सरकार काही साडेचार वर्ष तरी जात नाही. त्यामुळे आपली कामे करून घेण्यासाठी यांचा शर्ट धरल्याशिवाय पर्याय नाही, हे समजल्याने लोक भाजपकडे येत आहेत, असे विधान जेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर सपकाळ यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली.
काँग्रेस हा विचारधारेवर आधारित आणि कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष आहे. भाजप आपले एक कोटी कार्यकर्ते असल्याचा दावा करतो. एवढे कार्यकर्ते असतील तर तुम्हाला इतर पक्षातले नेते कार्यकर्ते कशाला लागतात, असा सवाल सपकाळ यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे वळून पहावे. मंत्रिमंडळातील निम्मे मंत्री काँग्रेस मधून आले असल्याचे त्यांना आढळून येईल, असेही ते म्हणाले.
भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे. मात्र, हे नेतृत्व अक्षम आणि पोकळ झालेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काँग्रेस मधील नेते आणि कार्यकर्ते घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही ही शोकांतिका आहे, असेही ते म्हणाले.