- राज्य
- 'भ्रष्टाचारात पहिला नंबर पण नीतिमत्ता, विकासात सर्वात शेवटी'
'भ्रष्टाचारात पहिला नंबर पण नीतिमत्ता, विकासात सर्वात शेवटी'
उद्धव ठाकरे यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र आज भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर आहे. विकास आणि नीतिमत्ता या बाबतीत मात्र शेवटच्या रांगेत आहे. या गोष्टीची भयंकर लाज वाटते, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
राज्य मंत्रिमंडळातील भ्रष्ट व मुजोर मंत्र्यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठीठाकरे गटाच्या वतीने राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली मुंबईतील आंदोलनाचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी केले.
एखाद्या मंत्र्यावर आरोप झाले तर त्याचा राजीनामा घेतला जातो. चौकशी केली जाते. आरोपात तथ्य आढळल्यास कारवाई केली जाते, ही आजवरची परंपरा आहे. मात्र या परंपरेला हरताळ फासला गेला आहे. आज राज्याला क्रीडा मंत्री नाही तर रमी मंत्री आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
भ्रष्टाचाऱ्यांचे करायचे काय... , अशा घोषणा आंदोलनात देण्यात आल्या. मात्र, खाली करायला यांना डोके असायला हवे ना? यांच्या डोक्यांच्या जागी खोके आहेत. सुरत आणि गुवाहाटीला पळून जाण्यासाठी हात, पाय आहेत, अशा शब्दात ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका केली.
राज्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचार आणि जुलूमाच्या विरोधात जनतेने एकत्रित येऊन विरोध करणे गरजेचे आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. जिल्ह्या जिल्ह्यात शिवसैनिक आंदोलन करत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी मर्दुमकी लागते. ती शिवसेनेत आहे, असेही ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची वाटते कीव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपल्याला कीव वाटते. राज्यात पाशवी बहुमताने सरकार सत्तेवर आले आहे. दिल्लीत यांचे बाप बसले आहेत. तरीही सरकार हतबल आहे. ही कीव करण्यासारखीच परिस्थिती आहे, असेही ठाकरे म्हणाले. हे सरकार जनताभिमुख नाही. त्यांना केवळ पैशाची भूक आहे, अशी टीकाही त्यांनी केली.