- राज्य
- उद्धव ठाकरे यांनाही भेटली निवडणूक जिंकून देणारी माणसं
उद्धव ठाकरे यांनाही भेटली निवडणूक जिंकून देणारी माणसं
सत्ताधाऱ्यांकडून मतदान यंत्र घोटाळ्याची पूर्वकल्पना दिल्याचा राऊत यांचा दावा
नवी दिल्ली: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना याप्रमाणे मतात फेरफार करून निवडणूक जिंकण्याचा दावा करणारी माणसे भेटली त्याचप्रमाणे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील माणसे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी भेटली होती. त्यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून मतदान यंत्र आणि याद्यांमध्ये फेरफार करण्याचे नियोजन असल्याची पूर्वकल्पना दिली होती, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत मतात फेरफार करून १६० जागांवर विजय मिळवून देण्याची ग्वाही देणारे दोघेजण भेटले होते. मात्र, आपण व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी या मार्गाने न जाण्याचा निर्णय घेतला, असा दावा केला आहे. राऊत यांनीही असाच अनुभव आल्याचे सांगून त्यांची री ओढली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच लोक ठाकरे यांना भेटले. मतदान यंत्रात फेरफार करून विजय मिळवून देण्याची खात्री त्यांनी दिली. मात्र, आम्हाला विजयाची खात्री असल्याने त्यांना नकार दिला.त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा ते लोक आले. तेव्हाही आम्हाला विजयाची खात्री होतीच. मात्र, तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मतदान यंत्र आणि याद्यांमध्ये फेरफार करण्यासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे तुमचा पराभव आम्हाला स्पष्ट दिसतो आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही, असे राऊत म्हणाले.
आम्ही निवडणूक आयोगावर, यंत्रणेवर विश्वास ठेवला. मात्र, शरद पवार हे देखील असाच अनुभव सांगत आहेत. त्यामुळे दुर्दैवाने त्या लोकांच्या सांगण्यात तथ्य असावे, असे राऊत यांनी नमूद केले.