'... तर काय भोक पडणार आहेत का?'
केतकी चितळे हिचा आणखी एक वादग्रस्त सवाल
मुंबई: प्रतिनिधी
एखादा माणूस नाही मराठीतून बोलला म्हणून काय भोक पडणार आहेत का, असा वादग्रस्त सवाल अभिनेत्री केतकी चितळे हिने केला आहे. केतकी ही नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. राज्यात सध्या हिंदीची सक्ती आणि मराठी अस्मिता या विषयावरून राजकीय वातावरण तापलेले असताना तिने केलेल्या सवालामुळे या वादाला आणखी हवा मिळणार आहे.
मराठीचा आग्रह दाखवतो आपलीच असुरक्षितता
एखाद्या माणसाला मराठी समजत नसेल अथवा बोलता येत नसेल तर त्यामुळे मराठीचे काही नुकसान होणार आहे का? मराठी भाषेला त्यामुळे काही फरक पडतो का, असे सवाल करतानाच केतकीने मराठी शिकण्याचा आणि बोलण्याचा आग्रह आपल्यामधील असुरक्षितताच दाखवीत असल्याचा आरोप केला आहे.
मराठी बोलल्याने पडतात का भोके?
मराठी भाषेसंदर्भात केतकीच्या वादग्रस्त सवालानंतर लगेचच वादांना सुरुवात झाली आहे. केतकी ही नशेत असल्यासारखी बोलत असल्याचा आरोप करून हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी तिच्या विधानांना फारसे गांभीर्याने घेण्याची आणि त्यातून राज्यातील राजकीय वातावरण आणखी खराब करण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केले आहे. मराठी न बोलल्याने जर भोके पडत नसतील तर मराठी बोलल्याने भोके पडतात का, असा प्रति सवाल त्यांनी केतकीला केला आहे.
केतकीची विधाने आणि तिने उभे केलेले प्रश्न हे पूर्णतः राजकीय स्वरूपाचे आहेत. कोणीतरी जाणून बुजून राज्यात मराठी अमराठी असा वाद उभा करू इच्छित आहे आणि केतकीची विधाने त्याला खत पाणी घालणारी आहेत, असा आरोपही दवे यांनी केला आहे.