- राज्य
- 'महायुतीला कमीपणा येऊ देणार नाही'
'महायुतीला कमीपणा येऊ देणार नाही'
अजित पवार यांनी दिले कोकाटे यांच्यावर कारवाईचे संकेत
मुंबई: प्रतिनिधी
अधिवेशन कार्ड विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा आरोप असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईचे संकेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी दिले आहेत. या प्रकरणात विधिमंडळाकडून चौकशी सुरू असून सोमवार किंवा मंगळवारी कोकाटे यांना मुख्यमंत्री आणि आपण निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. महायुती सहभागी असलेल्या प्रत्येक पक्षाने आपल्या नेत्यांना भान ठेवून बोलण्या, वागण्याचे आदेश दिले आहेत. कोणताही घटक पक्ष महायुतीला कमीपणा येऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
माणिकराव कोकाटे विधिमंडळात पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रसिद्ध केला. त्यानंतर विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाला टीकेचे लक्ष्य बनवण्यात आले आहे.
याबद्दल पत्रकारांची बोलताना अजित पवार म्हणाले की, यापूर्वी देखील कोकाटे यांना त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल दोन वेळा ताकीद देण्यात आली होती. इजा, बिजा आणि तिजा होऊ देऊ नका अशी समोरही देण्यात आली होती. मात्र, हे तिसऱ्यांदा घडले आहे. त्यामुळे निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत अजित पवार यांनी कोकाटे यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले.
कोकाटे आणि आपली भेट झाली नाही. सोमवार किंवा मंगळवारी त्यांना समक्ष बोलावून त्यांची बाजू ऐकून घेतली जाईल. त्यांनी आपण पत्ते खेळत नसल्याचा खुलासा केला आहे. त्याची शहानिशा केली जाईल. त्यानंतर त्यांच्याबाबत पुढील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी मिळून घेऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.
कोकाटे यांच्याबद्दल विधिमंडळाने चौकशी सुरू केली असल्याची आपली माहिती आहे. हा परिसर विधानसभा अध्यक राहुल नार्वेकर आणि राम कदम यांच्या अखत्यारीत आहे. कोकाटे यांच्या संदर्भात विधिमंडळाने सुरू केलेल्या चौकशीचा निष्कर्ष काय असेल, हे बघणे देखील महत्तचे आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.