- राज्य
- इजा, बिजा, तिजाबद्दल कारवाई की सजा?
इजा, बिजा, तिजाबद्दल कारवाई की सजा?
विधिमंडळात रमी खेळण्याचा आरोप असलेले कोकाटे यांच्याबद्दल नवा दावा
मुंबई: प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा आरोप असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. मात्र, माणिकराव कोकाटे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेचा आधार घेऊन कोकाटे यांच्यावर केलेली कारवाई सौम्य असल्याचा दावा केला जात आहे.
सतत वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात बसून मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रसिद्ध केला. त्यानंतर विरोधकांकडून केवळ कोकाटेच नव्हे तर सरकार आणि सत्ताधारी पक्ष टिकेचे लक्ष्य बनले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करून देखील कोकाटे यांच्याकडून मंत्रीपद काढून न घेता केवळ खांदेपालट केला जाईल, असा दावा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या चर्चेचा अहवाला देऊन करण्यात येत आहे.
माणिकराव कोकाटे यांनी आपण आयुष्यात कधीही मोबाईलवर रमी न खेळण्याचा दवा केला आहे. व्हिडिओ काढण्यात आला त्यावेळी आपल्या मोबाईलवर रमी ची जाहिरात आली होती. ती 15 ते 30 सेकंद बंद करता येत नसल्यामुळे ते चित्रण झाले आहे, असा दावा त्यांनी केला आहे. आपल्याला विशेष कार्यकारी अधिकाऱ्याकडून माहिती घेणे आवश्यक असल्यामुळे आणि त्यासाठी मोबाईल वरून कॉल किंवा संदेश करणे आवश्यक असल्यामुळे मोबाईल चालू करावा लागला, असा बचावही त्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर आपल्या बचावासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी नव्हे तर सरकार भिकारी असल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खुद्द त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी आपली नाराजी प्रकट केली आहे.
राज्यातील सर्व विरोधी पक्ष देखील कोकाटे यांच्या राजीनाम्यच्या मागणीवर ठाम आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह छावा संघटना आणि अन्य अनेक रजकीय संस्था संघटना देखील कोकाटे यांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. त्यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने झाली आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे कोकाटे यांच्यावर कठोर कारवाई होणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात झालेल्या चर्चेनुसार माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद काढून घेण्याऐवजी त्यांच्याकडून कृषी मत्री पद काढून घेऊन इतर मंत्री पद देण्यात यावे आणि कृषिमंत्री पद इतर कोणत्यातरी सक्षम नेत्याकडे सोपवावे, असे ठरल्याचे सांगण्यात येत आहे. जर हे खरे ठरले तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे हात कोणत्या दगडाखाली सापडले आहेत, या सवालाचे समर्थन केले जाऊ शकते.