- राज्य
- तुरुंगातून सुटल्यावर मिरवणूक काढणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड
तुरुंगातून सुटल्यावर मिरवणूक काढणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड
मुजोर गुंडांना पोलिसांचा दणका
ठाणे: प्रतिनिधी
कारागृहातून सुटल्यावर मिरवणूक काढून आनंद साजरा करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी मिरवणुकीच्या ठिकाणी नेऊन त्यांची धिंड काढली आणि चांगलाच दणका दिला. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
उल्हासनगर येथे दादागिरी करणाऱ्या दिवाकर यादव या सराईत गुंडाचा रमाबाई टेकडी परिसरात दारू पीत असताना काही जणांशी वाद झाला. त्यातून दिवाकर आणि त्याच्या साथीदारांनी वाद घालणाऱ्यांना लोखंडी रॉड आणि तलवारीने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दिवाकर आणि त्याच्या साथीदारांना गजाआड केले.
या प्रकरणात जामिनावर न्यायालयाने दिवाकर आणि त्याच्या साथीदारांना कारागृहातून सोडताच त्याच्या इतर साथीदारांनी मिरवणूक काढून त्यांचे स्वागत केले. फटाके फोडून आणि ढोल ताशे वाजवून आनंदोत्सव साजरा केला. ही बाब सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपली. ती प्रसिद्ध देखील झाली आणि गुन्हेगारांचे उदात्तीकरण होत आहे का, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करू लागले.
याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. पोलिसांनी दिवाकर व त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ज्या ठिकाणाहून मिरवणूक काढण्यात आली त्या ठिकाणापर्यंत आणले आणि भर दिवसा त्यांची धिंड काढत दहशत मोडून काढली.