- राज्य
- 'प्रशासनाकडून होत आहे आरोपींची पाठ राखण'
'प्रशासनाकडून होत आहे आरोपींची पाठ राखण'
महादेव मुंडे हत्याप्रकरणात पत्नीचा आरोप
बीड: प्रतिनिधी
महादेव मुंडे प्रकरणा त प्रशासन सुरुवातीपासूनच निष्क्रिय राहिले असून प्रशासनाकडून आरोपींची पाठराखंड केली जात असल्याचा आरोप महादेव मुंडे यांच्या विधवा पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी एसआयटी अथवा सीआयडी मार्फत करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थ आज दुपारी परळी ला जाणाऱ्या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
महादेव मुंडे यांची परळी तहसील कार्यालया lसमोर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला 21 महिने उलटून गेल्यानंतरही मारेकरी आणि सूत्रधार अद्याप मोकाट असल्याबद्दल मुंडे कुटुंबीय आणि ग्रामस्थांचा आक्षेप आहे. यासंदर्भात मुंडे कुटुंबीयांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून या भेटीत अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत केला जाईल किंवा हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला जाईल अशी ग्वाही दिल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही कारवाई केली जात नसून पोलीस आणि प्रशासन आरोपींना पाठीशी घालत आहे, असा मुंडे कुटुंबीय आणि ग्रामस्थांचा आरोप आहे.
वाल्मीक कराड यांच्या मुलाने केला खून
महादेव मुंडे यांच्या हत्येला माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटचे सहकारी वाल्मीक कराड हे कारणीभूत असून त्यांच्या मुलानेच महादेव मुंडे यांचा खून करविला आहे, असा महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर परळीच्या बंगल्यातून एक फोन आला आणि त्यामुळे या प्रकरणातील तपास थंड झाला. त्या काळात बंगल्यावरील सर्व सूत्रे वाल्मीक कराड यांच्या हातात असल्यामुळे त्यांनीच हा तपास थांबवण्याचा आरोप मुंडे कुटुंबीयांनी केला आहे.
पोलीस आणि प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने आज दुपारी अकरा वाजल्यापासून परळी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.