संघाचा ताप अन् मित्रपक्षांचा मनःस्ताप!
स्थित्यंतर / राही भिडे
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर संघ परिवार अजित पवार यांच्यावर फोडून मोकळे झाले खरे पण हा ग्रीन सिग्नल समजून भाजपच्या नेत्यांनी अजितदादांशी युती नको, असे स्थानिक पातळीवर सांगण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे शिवसेनेचा शिंदे गट सातत्याने अजितदादांची कोंडी करीत आहे आणि त्यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा देत आहेत. अजितदादांनी बाहेर पडून तिसरी आघाडी करून निवडणूक लढवावी, त्याचा फायदा महायुतीला व्हावा, असा तर शिवसेना-भाजपचा डाव नाही ना, अशी शंका निर्माण होते.
लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांत सातत्याने वादाची ठिणगी पडत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी तर त्यांच्या मनातील खदखद जाहीरपणे व्यक्त केली. अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत बसल्याने आम्हाला उलट्या होतात असे विधान करून त्यांनी एकच खळबळ उडवून दिली.. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. तसेच सत्तेतून बाहेर पडण्याचाही इशारा दिला. त्यातच आता भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती म्हणजे असंगाशी संग असल्याचे विधान केले. आतापर्यंत संयमी भूमिका घेणाऱ्या अजितदादांनाही मग संताप आला. प्रत्युत्तर देताना स्वतः अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यास फर्मावले. या सततच्या वादामुळे हे तिन्ही सत्ताधारी पक्ष एकमेकांपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीची मोठी हाराकिरी झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या पराभवासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीला जबाबदार धरले. त्यानंतर भाजपने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला; पण त्यानंतरही भाजप व शिवसेनेच्या काही नेत्यांनी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर शरसंधान साधून हा वाद तेवत ठेवण्याचे काम केले.
भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात अधूनमधून वाद होत असला, तरी त्या वादावर पडदा टाकला जातो. समज दिली जाते. अजित पवार यांच्याबाबत मात्र तसे होताना दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आल्यामुळे आम्हाला अक्षरशः उलट्या होतात असे विधान केले. आम्ही हाडामासाचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे माझे काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत केव्हाच जमले नाही. यामुळे कॅबिनेटच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसत असल्यामुळे आम्हाला उलट्या होतात. कारण आम्ही आमच्या तत्वांशी बांधील आहोत, असे ते म्हणाले होते. उघडउघड हा अजितदादा यांच्यावर हल्ला होता. त्याअगोदर रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांनी अजितदादा आणि त्यांच्या पक्षाला विश्वासघातकी ठरवले होते. दुसरीकडे अजित पवार यांनी त्यांच्या आमदारांच्या कामांच्या पाठवलेल्या फाईल मुख्यमंत्र्यांनी सह्यांसाठी अडवून ठेवल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे जसे गूळपीठ जमते, तसे शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी जमत नाही. टोकाचे वैचारिक मतभेद आणि परस्परविरोधी भूमिका हे त्याचे कारण आहे.
सावंत यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजित पवारांना असे बोलणे ऐकून घेण्यापेक्षा अशा सत्तेवर लाथ मारून बाहेर पडलेले बरे असा सल्ला दिला. महायुती झाली म्हणूनच सावंत मंत्री झाले अशी मखलाशीही त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला. महायुतीतील घटकपक्षांकडून होणारी अवहेलना आता सहन होत नाही. सावंत यांच्यासारख्या माणसाला हाफकिन माणूस आहे की संस्था हे कळत नाही. त्याच्याकडून काय अपेक्षा करणार? संबंधितांनी अशा लोकांना आवर घालावा, अन्यथा आमचा संयम सुटेल, असा इशारा मिटकरी यांनी दिला होता. सावंत व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील वादाची धग संपत नाही, तोच आता भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती म्हणजे असंगाशी संग असल्याचे विधान करून या वादाला नव्याने फोडणी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील व त्यांचे कार्यकर्ते प्रचाराला बाहेर पडलेच नाहीत. त्यामुळे भाजपच्या खासदाराला पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाबरोबर झालेली युती अत्यंत दुर्दैवी आहे. खरे म्हणजे ही युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगाशी संग म्हणतात तसा संग आमच्यासोबत घडवण्यात आला, असे हाके यांनी म्हटले आहे. हाके यांच्या या जहरी टीकेनंतर अजित पवार यांच्या संयमाचा बांध सुटला. त्यांनी या मुद्यावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. अशी थेट टीका करणाऱ्यांना सोडून देतील ते दादा कसले ? मला कुणावरही टीका करायची नाही. अशा बोलण्यामुळे माझ्या अंगाला भोकेही पडत नाहीत; पण खरेच असे कुणी काही बोलले असेल तर माझेही कार्यकर्ते त्याला योग्य ते उत्तर देतील, असा हल्लाबोल त्यांनी केला. एकप्रकारे टीका करणाऱ्या महायुतीतील घटकपक्षांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याचेच आदेश अजित पवारांनी दिले आहेत. त्यामुळे महायुतीतील वाद एका तार्किक निष्कर्षाला जाईपर्यंत थांबणार नाही, हेच यामधून स्पष्ट होत आहे. पवार यांच्या विधानानंतर काही वेळातच राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोफ असणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांनी मित्र पक्षांच्या नेत्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना वादग्रस्त विधाने करण्यापासून थांबण्याची तंबी दिली. या विधानांशी सर्वांचा संबंध नसला तरी निवडणुकीच्या तोंडावर मने दुखावली जातात. निवडणुकीच्यावेळी आपण एकसंध आहोत, हे लोकांना दाखवावे लागते; पण अशा विधानांमुळे आपल्यातील वादाची मजा विरोधी पक्ष घेतील असे बोधामृत भुजबळांनी पाजले.
बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची बाब उजेडात आली होती. त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. या प्रकरणी सरकारला चौफेर टीका सहन करावी लागली. या घटनेचे वादळ शमते न शमते तोच मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. विशेषतः यामुळे सरकारने राबवलेल्या महत्त्वकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनाही झाकोळली गेली. महायुतीतील वादावादीमुळे सरकारची प्रतिमाही मोठ्या प्रमाणात मलिन होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीच्या घटकपक्षांत एकमेकांना पाण्यात पाहण्याचा हा वाद उफाळून आला आहे. राज्यात विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. असे असताना महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. त्याअगोदर पुण्यातील भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांनी अजित पवार सोबत नको, अशी जाहीर भूमिका घेतली. वाद महायुती तुटण्यापर्यंत जात असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सावरून घेण्याचा प्रयत्न केला. आरोग्यमंत्र्यांना उलट्या येत असतील तर ते स्वत: आरोग्य मंत्री आहेत. त्यांनी त्याचे औषध घ्यावे. चुकीचे वक्तव्य करू नये. त्यांना जमत नसेल तर त्यांनी गप्प बसावे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, अशा शब्दांत गोगावले यांनी सावंत यांना घरचा आहेर दिला. अजित दादांची डोकेदुखी वाढली असल्याने तिसरी आघाडी अस्तित्वात येईल का याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा होत आहे.
000
Comment List