- राज्य
- सरकार आणि भाजपच्या भूमिकेत महिन्याभरात उलटफेर
सरकार आणि भाजपच्या भूमिकेत महिन्याभरात उलटफेर
भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यासंदर्भात जयंत पाटील यांची टीका
नाशिक: प्रतिनिधी
रक्त आणि पाणी एकत्र होऊ शकत नाही, अशी भूमिका घेणाऱ्या केंद्र सरकारने भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी दिली आहे. वास्तविक, पाकपुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबर क्रिकेटचा सामना खेळणे योग्य नाही. मात्र, केंद्र सरकार आणि सत्तारूढ भारतीय जनता पक्ष यांच्या भूमिकांमध्ये महिन्याभरात उलटफेर होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या प्रदेश पातळीवरील शिबिरात उपस्थित राहण्यासाठी आलेल्या पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला आपल्या पक्षाचा विरोध असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख रोहिणी खडसे यांनी देखील क्रिकेट सामन्याला विरोध व्यक्त केला. त्याचप्रमाणे त्यांनी राज्य सरकारवरही टीका करण्याची संधी साधली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाची आणि लष्कराची बाजू जगासमोर समर्थपणे मांडणाऱ्या महिला लष्करी अधिकारी सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांना आपले नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच संधी मिळाली. शरद पवार आणि कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. आपल्या पक्षात महिलांना सन्मान मिळतो याचा आपल्याला अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चांगली योजना आहे. मात्र, अनेक महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. महायुती सरकारच्या काळात महिलांवर अन्याय, अत्याचार होत आहेत. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री महिला अधिकाऱ्यांना धमक्या देत आहेत. याच्या विरोधात महिलांनी संघटित झाले पाहिजे. लढा आंदोलने उभारली पाहिजे, असेही खडसे म्हणाल्या. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता सर्वांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, हे आपल्या पक्षाने वारंवार स्पष्ट केले आहे, असेही त्या म्हणाले.
'... म्हणजे मी नाराज, असे नाही'
कार्यक्रमाला येण्यास जयंत पाटील यांना विलंब झाला. मागील दीर्घ काळापासून पाटील हे पक्षात नाराज असल्याच्या आणि ते कोणत्याही क्षणी सत्तारूढ पक्ष सहभागी होऊ शकतात, अशा अर्थाच्या चर्चा घडून येत आहेत. शिबिराला येण्यास विलंब झाल्यामुळे पाटील या शिबिरात सहभागी होणार की नाही, अशा शंका देखील उपस्थित केल्या जाऊ लागल्या होत्या. मात्र, वंदे भारत एक्सप्रेसला उशीर झाल्यामुळे मला देखील कार्यक्रमाला येण्यास उशीर झाला. मी उशिरा आलो याचा अर्थ मी नाराज आहे असा काढू नये, असे पाटील यांनी स्पष्ट केले.