'मी दलाली, फसवणूक न करता प्रामाणिकपणे कमावतो पैसे'
इथेनॉल सक्ती प्रकरणी नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
नागपूर: प्रतिनिधी
मी कोणाची दलाली करत नाही. कोणाची फसवणूक करत नाही. प्रामाणिकपणे पैसा कमवतो. माझ्या बुद्धीची किंमत महिन्याला 200 कोटी रुपये आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय दळणवळण व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.
आपल्या मुलाच्या कंपनीला फायदा व्हावा यासाठी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचा नियम केला जात असल्याचा आरोप गडकरी यांच्यावर होत आहे. या आरोपाला गडकरी यांनी सडेतोड उत्तर दिले.
इथेनॉल हा पेट्रोल आणि डिझेलला समर्थ पर्याय आहे. भारतात पुरेसे पेटवलातवा डिझेल उपलब्ध होत नाही. त्याची आयात करावी लागते. त्यामध्ये देशाचे कोट्यावधी रुपये खर्च होतात. इथेनॉल चा वापर केल्यामुळे हे परदेशी चलन बचत होते. त्याचप्रमाणे पेट्रोल, डिझेलमळे प्रदूषण होते. इथेनॉलमुळे पर्यावरण संरक्षण होते, असा दावा गडकरी यांनी केला.
विदर्भात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही लाजिरवाणी बाब आहे. इथेनॉलचा वापर केल्यामुळे शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे. इथेनॉलपासून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त तरीही भरीव उत्पन्न ठरणार आहे, असा दावाही गडकरी यांनी केला. आपण स्वतः वापरत असलेली इनोव्हा गाडी इथेनॉलवर चालत असून त्याचा इंधनाचा खर्च पेट्रोल डिझेल पेक्षा निम्मा असल्यासही गडकरी यांनी सांगितले.
इथेनॉलच्या वापरामुळे गाड्यांच्या इंजिनमध्ये बिघाड होत असल्याचा दावा केला जातो. हाच दाव करत इथेनॉल वापराच्या सक्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळली आहे, हे गडकरी यांनी निदर्शनास आणून दिले.
सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका इथेनॉलच्या विरोधात नव्हती तर ग्राहकांच्या निवडीचा हक्क या मुद्द्यावर ती याचिका करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सन 2023 नंतरच्या वाहनांची यंत्रणा इथेनॉलला अनुकूल आहे. मात्र, त्यापूर्वीच्या वाहनांमध्ये इथेनॉलच्या वापरामुळे दुष्परिणाम दिसून येतात, असा दावा देखील या याचिकेत करण्यात आला होता. मात्र, तो ही न्यायालयाने फेटाळून लावला आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
पैसे देऊन बदनामी करण्याचा हितशत्रूंचा डाव
इथेनॉल प्रकरणावरून आपल्यावर करण्यात आलेले आरोप हा आपली बदनामी करण्याचा हितशत्रूंचा डाव आहे. त्यांच्याकडून पैसे देऊन आपल्या बदनामीची मोहीम चालवली जात आहे, असा आरोप गडकरी यांनी केला. उल्लेखनीय बाब म्हणजे कार्यक्षम आणि लोकप्रिय मंत्री म्हणून गडकरी यांचा वाढणारा नावलौकिक सहन होत नसल्यामुळे त्यांच्याच पक्षातील उच्चपदस्थ नेत्यांकडून गडकरी यांना बदनाम करण्यात येत आहे. गडकरी हे इतरांची पर्वा न करता स्वयंपूर्णतेने धडाडीचे निर्णय घेत असल्यामुळे त्यांच्या वरिष्ठांच्या मनातही त्यांच्याबद्दल आकस असल्याची चर्चा आहे.