- राज्य
- मावळ तालुक्यात भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव
मावळ तालुक्यात भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्यांना पिक संरक्षण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आमदार सुनील शेळके यांचे आवाहन
वडगाव मावळ /प्रतिनिधी
मावळ तालुक्यात यंदा सुमारे ७ ते ८ हजार एकर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. परंतु या पिकावर तांबा व करपा या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५ पासून प्रत्येक भात उत्पादक शेतकऱ्यास औषध फवारणीसाठी पिक संरक्षण कर्ज योजनेअंतर्गत १०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेत आत्तापर्यंत केवळ ४८३ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करून सहभाग घेतला आहे. मात्र संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, “भात पिकावर आलेल्या तांबा आणि करपा या रोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी भीती न बाळगता त्वरित पिक संरक्षण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. आपल्या शिवारावर किडनाशक फवारणी करून पिकाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये अधिकाधिक जनजागृती करीत रोग नियंत्रणासाठी योग्य मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी आवाहन केले.
दरम्यान, ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडे औषध फवारणी ड्रोन उपलब्ध करून देण्याची विनंती कारखान्याच्या चेअरमन यांच्याकडे करण्यात आल्याची माहितीही आमदार शेळके यांनी दिली.
पिक संरक्षण कर्ज योजनेचा उत्स्फूर्त लाभ घेऊन आपल्या पिकाचे रक्षण करावे. शासन, बँक व स्थानिक प्रशासन या सगळ्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचे पीक वाया जाणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी मिळून घ्यायची आहे,” असे आवाहन शेवटी आमदार सुनील शेळके यांनी केले.
About The Author
