खुद्द अजित पवार करणार छगन भुजबळ यांची मनधरणी
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील भुजबळांना भेटणार
नागपूर: प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असून त्यांची मनधरणी करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकला जाणार आहेत. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील भुजबळ यांची भेट घेणार आहेत.
भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. कोण दादा कसला वादा, जहा नही चैना, वाहन ही रहना, अशी विधाने भुजबळ करीत आहेत. त्यांनी बंडाचे निशाण उभारण्याची तयारी केली आहे. भुजबळ समर्थक कार्यकर्ते आणि समता परिषदेचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलने करीत आहेत. समता परिषदेची महत्त्वाची बैठक नाशिक येथे पार पडत आहे. या बैठकीनंतर भुजबळ आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
आपल्याला मंत्रिपद देण्याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते. आपल्या मंत्रिपदाला त्यांनी कधीही विरोध केलेला नाही. असे असताना कोणाच्या सांगण्यावरून आपल्याला डावळण्यात आले याचा शोध घेत आहे, असा सूचक इशारा देखील भुजबळ यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द अजित पवार, पटेल आणि तटकरे यांच्या शिष्टाईला कितपत यश मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.