'सरपंच हत्या प्रकरणी आरोपींवर लावणार मोक्का'
सखोल चौकशीची मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
नागपूर: प्रतिनिधी
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते सहभागी असलेल्या प्रत्येक आरोपीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जातील. या गुन्ह्याचा कोणीही असला, कोणाच्याही जवळचा असला तरीही त्याची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे तर पोलिसांची आठ पथके अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. वाल्मीक कराड हा या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. कराड हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सलग दुसऱ्या दिवशी या प्रकरणावर चर्चा सुरू आहे.
गावात सुरू असलेल्या पवनचक्कीच्या कामावरील सुरक्षारक्षकाला झालेली दमदाटी आणि मारहाण या प्रकरणाचा देशमुख यांच्या हत्येच काय संबंध आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक या प्रकरणाचा तपास करणार आहे. वाल्मीक कराड याच्या सहभागाबद्दल माहिती हाती लागली आहे. त्याच्यावर निश्चितपणे गुन्हा दाखल केला जाईल. त्याची कोणा कोणा बरोबर छायाचित्र आहेत याची माहिती आमच्याकडे आहे. मात्र त्याचा तपासावर कोणताही परिणाम होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
याप्रकरणी प्रथम माहिती अहवाल दाखल करून घेऊन निष्क्रिय राहण्याच्या पोलिसांच्या भूमिकेबद्दलही फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी न्यायालयीन चौकशीही करण्यात येईल. चार ते सहा महिन्यात या चौकशीचा अहवाल सादर होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.